पतीचा कुष्ठरोग बरा होत नसल्याने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 04:04 PM2019-12-08T16:04:04+5:302019-12-08T16:15:14+5:30

अपघाताचा केला होता बनाव

Husband murdered due to leprous Disease not cure | पतीचा कुष्ठरोग बरा होत नसल्याने केला खून

पतीचा कुष्ठरोग बरा होत नसल्याने केला खून

Next
ठळक मुद्देमावळ तालुक्यातील घटना पत्नीसह तिचा प्रियकर व एका अल्पवयीनासह दोन मुले पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : पतीला कुष्ठरोग असल्याने त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. ते फेडता येत नाही म्हणून तसेच उपचार करूनही कुष्ठरोग बरा होत नाही म्हणून, आपल्याला व आपल्या मुलांनाही कुष्ठरोग होईल अशी पत्नीची धारणा झाली. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने व आपल्या दोन मुलांच्या साथीने पत्नीने पतीचा खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव केला. मात्र पतीचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून झाल्याचे समोर आले. तसेच हा खून पत्नीने प्रियकराच्या मदतीने व मुलांच्या साथीने केला असल्याचे पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केलेल्या तपासातून उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर तुकाराम फाळके (वय ४७, रा. गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजेश सुरेश कुरुप (वय ४५, रा. गहुंजे, ता. मावळ, तसेच वानवडी, पुणे), वेदांत दामोदर फाळके (वय १९), दामिनी दामोदर फाळके (वय ४२) व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. गहुंजे, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. दामिनी ही दामोदरची पत्नी आहे, तर आरोपी वेदांत व अल्पवयीन मुलगा हे दोघेही दामिनी व दामोदर यांचे मुले आहेत. 
दामोदर तुकाराम फाळके यांचा दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अपघात होऊन मृत्यू झाल्याबाबत त्यांचा मुलगा वेदांत फाळके याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी अपघाताची नोंद केली होती. दामोदर फाळके यांची पत्नी दामिनी व राजेश कुरुप यांचे अनैतिक संबंध असून दामोदर यांचा खून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी केला असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) राजेश कुरुप, वेदांत फाळके, त्याचा अल्पवयीन भाऊ यांच्याकडे सखोल तपास केला. आरोपी राजेश कुरुप याचे व दामिनी फाळके यांचे सुमारे १२ वर्षांपासून संबंध आहेत, असे आरोपी राजेश याने पोलिसांना सांगितले. 
दामोदर यांना कुष्ठरोग असल्याने, त्याची पत्नी व मुलांना कुष्ठरोग होईल अशी त्याची, दामिनी व दोन्ही मुलांची धारणा झाली होती. दामिनी हिने दामोदर याच्या उपचारांसाठी १२ लाख रुपये कर्ज म्हणून घेतले होते. दामोदर यांच्यावर उपचार करूनसुध्दा रोग बरा होत नसल्याने राजेश, दामिनी, वेदांत व अल्पवयीन मुलगा यांनी दामोदर फाळके यांच्या खुनाचा कट रचला. दि. २२ नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास दामोदर कामावरून त्यांच्या मालकीच्या हॉटेलवर आले. जेवण करून हॉटेल बंद करून घरी जात होते. त्यावेळी मामुर्डी (ता. मावळ) गावाच्या हद्दीत आरोपी राजेश याने त्याच्या चारचाकी वाहनाने दामोदर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. तसेच त्याने गाडीमधील जॅक दामोदरच्या डोक्यामध्ये जोरात मारला. त्यानंतर वेदांत याने दामोदर यांच्या डोक्यामध्ये दगड घातला. त्यानंतर सर्वजण घरी निघून गेले. दामोदर व त्याच्या दुचाकीचा अपघात झाला आहे, असा बनाव आरोपींनी केला. 
गुन्हे शाखा, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, वसीम शेख, दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, धनंजय भोसले, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, आशा जाधव, नागेश माळी व अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Husband murdered due to leprous Disease not cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.