पत्नीचे अनैतिक संबंध पतीच्या जीवावर बेतले, मृतदेह फेकून दिला खाडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 09:38 PM2020-03-06T21:38:41+5:302020-03-06T21:40:29+5:30
तिघांना अटक : मृतदेहावरील कपडय़ांवरुन पोलिसांनी लावला छडा
नवी मुंबई - अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीची हत्या करणाऱ्याला दोन साथीदारांसह पोलिसांनीअटक केली आहे. गतमहिन्यातली घणसोलीतली हि घटना असून सदर मृतदेह एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीत सापडला होता. याप्रकरणी तपासादरम्यान मृतदेहावरील कपडय़ांवरुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीमध्ये १३ फेब्रुवारीला एक अज्ञात मृतदेह आढळला होता. सदर मृत व्यक्तीच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने घाव केल्याच्या जखमा होत्या. त्यानुसार मृतदेहाची ओळख पटवण्याच्या प्रयत्न पोलिसांनी नवी मुंबईसह राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवली. परंतु सदर मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. अखेर मयत व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेवून त्या वयाच्या बेपत्ता असलेल्या व्यक्तींकडे चौकशीवर जोर देण्यात आला होता. त्याकरिता गुन्हे शाखा कक्ष तीन चे वरिष्ठ निरिक्षक विजय कादबाने, पनवेल शहरचे वरिष्ठ निरिक्षक अजयकुमार लांडगे, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संदीपान शिंदे, मध्यवर्ती कक्षाच्या सहायक निरिक्षक राणी काळे, सहायक निरिक्षक श्रीकांत शेंडगे, पोलीस हवालदार शरद भरगुडे, शेखर वक्टे, प्रविण बाबा, गौतम कांबळे आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
त्यांनी घणसोली येथून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या चौकशीत मृतदेहाची ओळख पटली. यावेळी त्यांचे नाव खडकबहादुर सिंग (४५) असल्याचे समोर आले. परंतु त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा होवू शकलेला नव्हता. यामुळे पोलिसांनी तांत्रीक तपासावर भर दिला असता, तिघांची माहिती समोर आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हत्येचा गुन्हे उघडकीस आला. यानुसार कैलाश खरात (29), जय चव्हाण (२५) व वली सय्यद (२०) यांना अटक केली. तिघेही रबाळे परिसरातील राहणारे आहेत. त्यापैकी कैलास याचे सिंगच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे प्रेयसीच्या पतीचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने जय व वली यांच्या मदतीने सिंग यांची ९ फेब्रुवारीला घणसोलीत एकांताच्या ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री दिडच्या सुमारास मृतदेह रिक्षातून ऐरोली पुलावरुन खाडीत फेकला होता. त्यानंतर तो चार दिवसांनी एनआरआयच्या खाडीत आढळल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरवात केली होती.