विवाहबाह्य संबंधातून महिला पोलीस काॅन्स्टेबलने केली पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:24 AM2021-03-04T05:24:24+5:302021-03-04T05:25:01+5:30
महामार्गावरील ढेकाळे गावाच्या जवळ १७ फेब्रुवारीला एका रिक्षात अनाेळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकून दिल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनाेळखी व्यक्तीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील ढेकाळे येथे एका रिक्षात झालेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. महिला पाेलीस काॅन्स्टेबलने आपल्या खात्यातीलच सहकाऱ्यासाेबत असलेले विवाहबाह्य संबंध उघड हाेऊ नये यासाठी पोलिसी ट्रिक वापरून रिक्षाचालकाचा खून केल्याचे उघड झाले आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा अतिशय कुशलतेने तपास करून मुख्य आराेपी काॅन्स्टेबल विकास पष्टे आणि स्नेहल पाटील यांच्यासह विशाल पाटील, स्वप्निल गोवारी, अविनाश भोईर यांना अटक केली आहे.
महामार्गावरील ढेकाळे गावाच्या जवळ १७ फेब्रुवारीला एका रिक्षात अनाेळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकून दिल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनाेळखी व्यक्तीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मृतदेह वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल स्नेहल पाटील हिचे पती पुंडलिक पाटील (वय ३०) यांचा असल्याची माहिती उघड झाली.
मृत पाटील याने मस्तान नाक्याचे भाडे आल्याने येतो का, असा फोन मित्राला केला होता. त्यादरम्यान मृताच्या पत्नीचे आणि तिच्या पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचे प्रेमप्रकरण असल्याची माहिती उघड झाली. याचवेळी पोलिसांनी मृत रिक्षाधारकाच्या मोबाइलवर आलेल्या कॉल रेकॉर्डच्या काही तांत्रिक बाजू तपासल्या असता महत्त्वपूर्ण धागा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी निवडक मोबाइलधारकांना एकत्र करून सांगितलेल्या वर्णनावरून स्केच बनवले. या स्केचच्या आधारे पष्टे याला ताब्यात घेतले.
असा रचला कट :
संशयित आरोपी पष्टे याने मृत पुंडलिक याला शिरसाट ते मस्तान अशा प्रवासासाठी तीन वेळा नेऊन प्रत्येकवेळी एक हजार भाडे देऊन त्याने हत्येचा प्लॅन बनवला. हा खून वाटू नये म्हणून कुठल्याही हत्याराऐवजी लोखंडी रॉडचा वापर करून तपासाची दिशा भरकटवण्याचा डाव आखला होता. लघुशंकेच्या बहाण्याने पुंडलिकला खाली उतरून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने फटका मारून ठार केले. नंतर रिक्षाच्या मागच्या सीटखाली टाकून रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात रिक्षा ढकलून देण्यात आली. या दरम्यान त्यांनी प्लॅन करून त्याचा मृतदेह हायवेवर टाकून अपघात झाल्याचे भासवून पोलीस दप्तरी ‘फेटल गुन्हा’ नोंदवून हे प्रकरण दाबण्याचा कट रचला होता.