बारमध्ये काम करते म्हणून पतीने हत्या करून पत्नीचे केले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 08:10 PM2019-04-24T20:10:01+5:302019-04-24T20:12:00+5:30
हमीद सरदार असं या आरोपी पतीचं नाव आहे.
ठाणे - काही दिवसांपूर्वी ठाणे ग्रामीण पोलिसांना एका पिंपात हात, पाय, डोकं कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी डान्स बारमध्ये काम करते म्हणून पतीने तिची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे हात, पाय, डोकं, धडापासून वेगळे करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हमीद सरदार असं या आरोपी पतीचं नाव आहे. मृत सबीना ही डान्स बारमध्ये जात असल्यामुळे त्याला राग येत होता. घटनेच्या दिवशी सबीना घरात झोपली असताना तिचे तोंड दाबून त्याने तिची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून तिचे हात, पाय आणि डोकं धडावेगळे करून पिंपात फेकून देण्यात आले होते.
हमीदला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी येथे सोनाळे गाव परिसरात १३ एप्रिल रोजी एका पिंपात हात, पाय, डोकं कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतेदह पोलिसांना मिळाला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. ज्या पिंपामध्ये मृतदेह आढळला. त्या पिंपावरील बॅचची माहिती पोलिसांनी काढली. त्यावेळी हा पिंप भिंवडी येथील भैरव सिंथेटिक या दुकानातून खऱेदी केला गेल्याचे समोर आले. तो पिंप एका भंगार विक्रेत्याला विकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर भंगार विक्रेत्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने हा पिंप एका व्यक्तीला विकला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा एक व्यक्ती तो पिंप रिक्षातून घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी रिक्षाचा शोध लावून रिक्षाचालकाला विचारणा केली असता त्याने ज्या घरात पिंप नेला त्याचा पत्ता सांगितला. ते घर हमीद सरदार याचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी रिक्षाचालकाने दिलेल्या पत्त्यावर चौकशी केल्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले.