नागपुरात पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:14 IST2020-06-29T20:14:20+5:302020-06-29T20:14:57+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी प्रत्येक गोष्टीत रोकटोक करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली.

नागपुरात पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी प्रत्येक गोष्टीत रोकटोक करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली.
नयना विकी रोकडे असे जखमी महिलेचे तर विकी दामोदर रोकडे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून अजनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी विकी रोकडे हा रेल्वेचा कर्मचारी असून तो अजनीतील रेल्वे वसाहतीत राहतो. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी नयनासोबत विकीचा नेहमी वादविवाद व्हायचा. रविवारी सकाळी १० च्या सुमारास आरोपी विकी घराबाहेर जायला निघाला. तेव्हा पत्नीने आज सुटीच्या दिवशी बाहेर कशाला जाता, असे म्हणून त्याला घराबाहेर जाऊ दिले नाही. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. सुटीच्या दिवशी मुलासोबत खेळा, असे म्हणतानाच पत्नीने बुधवारी कुणाला व्हिडिओ कॉल केला होता, असे विचारले. त्यामुळे या दोघांमधील वाद वाढला आणि आरोपी विकीने पत्नी नयनावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यानंतर त्यांनी आरोपीला आवरले. जखमी नयनाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी भादविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी विक्की रोकडे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.