रागाच्या भरात त्याने इलेक्ट्रिक कटरने कापला स्वत:चाच गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:43 PM2019-03-21T23:43:02+5:302019-03-21T23:43:18+5:30
पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून एकाने आपल्या गळ्यावर लाकूड कापण्याची कटर मशीनने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना घडली.
पुणे - पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून एकाने आपल्या गळ्यावर लाकूड कापण्याची कटर मशीनने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना वारजे गावठाणातील पायगुडे बिल्डींगमध्ये गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
संजयकुमार रंगलाल प्रसाद भारती (वय ३४, रा. उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय कुमार भारती हा मुळचा उत्तरप्रदेशातील राहणार आहे. तो नव्या वर्षापासून रामनगर येथील दिलीप बराटे यांच्या घराजवळील पायगुडे बिल्डिंगमध्ये रहात होता. घराजवळच तो एका खोलीमध्ये सुतार काम करीत. गुरुवारी दुपारी त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. रागाच्या भरात तो घरातून बाहेर पडला व त्याच्या कामाच्या खोलीमध्ये गेला. खोलीत सुतार कामाचे सर्व साहित्य होते. त्यातील इलेक्ट्रीक कटर त्याने सुरु केला. त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी व भाऊ बाहेरुन आरडाओरडा करु लागले. शेजारच्या लोकांनी सिलिंग तोडून आत प्रवेश केला. तोपर्यंत त्याने आपल्या गळ्यावर कटर चालविली होती. त्यात त्याचा जागेवरच मृत्यु झाला.
वारजे पोलिसांनी याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. खोलीत रक्ताचे थारोळे साचले होते. इलेक्ट्रीक कटरलाही रक्त लागलेले होते. वारजे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे.