रात्री शूटरला घरी झोपवलं अन् सकाळी हाती पिस्तुल दिली; पत्नीनं पतीलाच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:15 PM2022-09-16T12:15:35+5:302022-09-16T12:16:04+5:30
नीतू प्रदीपसोबत खूप दुखी होती. तिने प्रदीपच्या हत्येसाठी ३० हजार रुपये एडवान्स दिला होता असं आरोपीनं पोलीस तपासात सांगितले.
मेरठ - शहरात झालेल्या प्रदीप शर्मा हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्येचं षडयंत्र १२ सप्टेंबरला रचण्यात आले होते. प्रदीपची पत्नी नीतूनं रात्री शूटर समीरला घरातच मुक्कामासाठी ठेवले अन् दुसऱ्यादिवशी सकाळी पिस्तुल हाती देत तो वाचायला नको असं म्हटलं. समीर आणि मनिष यांनी चोरीच्या बाईकचा वापर केला. या हत्येत पत्नी नीतू आणि २ सहकारी सहभागी होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा व पत्नी नीतू यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप प्रदीप सातत्याने करत होता. ती माझी हत्या करू शकते असंही प्रदीपनं म्हटलं होते. ३ महिन्यापूर्वी प्रदीपवर गोळीबारही झाला होता. तरीही पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं. चकमकीत जखमी असलेल्या शूटर समीरनं सांगितले की, आम्ही नीतू यांच्या घरी ६ महिन्यापासून भाड्याने राहत होतो. प्रदीप दारू पिऊन यायचा आणि नीतूला मारहाण करायचा. नीतूचा मित्र अनित कुमार तिच्या घरी येऊन जात असे. २ महिन्यापूर्वी अनित आणि समीरला नीतूने घरी बोलावलं. तुम्ही प्रदीपला ठार करा, मी तुम्हाला १.५० लाख रुपये देईन अशी सुपारी दिली होती.
प्रदीपच्या हत्येसाठी नीतू सारखं अनितला कॉल करत होती. १२ सप्टेंबरला नीतूच्या घरी प्रदीपच्या हत्येचा कट रचण्यात आला. शूटर समीर आणि सहकारी यांनी प्रदीपबद्दल माहिती काढली. मंगळवारी रात्री समीर नीतूच्या घरी पोहचला आणि तिथेच रात्री झोपला. सकाळी ७ वाजता मनिषही नीतूच्या घरी आला. दोघांनी चहा नाश्ता केला आणि निघून गेले. नीतूनं प्रदीपला फोन करून बोलावलं. नीतूशी बोलून प्रदीप घराबाहेर कारजवळ पोहचला तेव्हा शूटर समीर, मनिषनं प्रदीपला गोळी मारली आणि तिथून पसार झाले.
नीतू प्रदीपसोबत खूप दुखी होती. तिने प्रदीपच्या हत्येसाठी ३० हजार रुपये एडवान्स दिला होता. तर काम झाल्यानंतर १.२० लाख रुपये मिळणार होते असं समीरनं पोलीस तपासात सांगितले. तर प्रदीप माझ्या आयुष्याचा आधार होता. आधीच २ मुलांचा मृत्यू झाला होता त्यात आता प्रदीपही या जगात नाही असं प्रदीपचे वडील देवेंद्र शर्मा यांनी म्हटलं.