पत्नीला विहिरीत ढकलून पती जागोजागी घेत होता तिचाच शोध; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 23:13 IST2021-09-15T23:10:54+5:302021-09-15T23:13:54+5:30
पोलिसांकडून आरोपी पतीला अटक; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पत्नीला विहिरीत ढकलून पती जागोजागी घेत होता तिचाच शोध; अन् मग...
राजस्थान: बन्सवारा जिल्ह्यातल्या आनंदपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोहनिया गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातल्या एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीला अटक केली.
पोलिसांनी या प्रकरणी पतीची चौकशी केली. पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्यानं हत्येची कबुली दिली. महिलेचे अवैध संबंध असल्याचा संशय असल्यानं पतीनं तिची हत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कपिल पाटीदार यांनी दिली.
आरोपी पतीनं रात्री पत्नीला झोपेतून उठवलं. तो तिला शेतात असलेल्या विहिरीकडे घेऊन गेला. त्यानंतर त्यानं तिला धक्का दिला. विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी पती थावरचंदनं त्याच्या कुटुंबाला पत्नी संगीता कुठेच सापडत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी संगीताचा शोध घेतला. मात्र तिचा ठावठिकाणा न सापडल्यानं आनंदपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. थावरचंदबद्दल संशय असल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यानं सातत्यानं वेगवेगळी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. पुढे पोलिसी हिसका दाखवल्यानंतर थावरचंदनं हत्येची कबुली देत घटनाक्रम सांगितला.