दुसऱ्या महिलेसोबत अश्लिल चॅट करायचा पती; संतापलेल्या पत्नीने चार्जरनं जीव घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:59 AM2022-07-13T11:59:28+5:302022-07-13T11:59:49+5:30
पोलिसांना पत्नीच्या हालचालीवर संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले. या घटनेची कसून चौकशी केली असता पत्नीने गुन्हा कबुल केला.
फतेहपूर - आपल्या नजरेसमोरच पती दुसऱ्या महिलेसोबत अश्लिल चॅट आणि व्हिडिओ कॉल करत असल्याने पत्नीचा राग अनावर झाला. तिने चार्जर केबलनं पतीचा गळा आवळून खून केला आहे. राजस्थानच्या फतेहपूरमधील शेखावाटी इथं ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली असून तिने हत्येचा खुलासा केला.
डीएसपी राजेश विद्यार्थीने सांगितले की, पती मकसूदचे परस्त्रीसोबत संबंध होते. तो पत्नीसमोरच तिच्याशी अश्लिल चॅट करत होता. ज्यामुळे पत्नी नाराज होती आणि तिने पतीची हत्या करण्याचा प्लॅन रचला. २ जुलै रोजी आरोपी महिला पती आणि सासूसोबत एका लग्न समारंभात गेली होती. समारंभातून पती घरी परतला आणि पत्नी १ तासानंतर घरी पोहचली. ज्यावेळी पत्नी घरी परतली तेव्हा पती मकसूद झोपलेला होता. तेव्हा संधीचा फायदा घेत सुरुवातीला ओढणीचा फास बनवला त्यानंतर मोबाईल चार्जरनं त्याला संपवलं. इतकेच नाही तर पतीने आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी पत्नीने त्याचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. जेणेकरून ही आत्महत्या आहे असं पोलिसांची दिशाभूल करता येईल.
पोलिसांना पत्नीच्या हालचालीवर संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले. या घटनेची कसून चौकशी केली असता पत्नी मदिनाने पोलिसांना सांगितले की, मकसूद तिच्याशी रोज वाद घालत असे. मारहाण करून शारिरीक छळ करायचा. मदीनाने ओढणीने फास तयार करत कपाटात ठेवला. अनेक दिवसांपासून ती पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखत होती. पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. पत्नीने हत्येची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
आत्महत्येवर सासूला आला संशय
मदिनाने मकसूदच्या हत्येनंतर त्याला आत्महत्या असल्याचं भासवलं. घरच्यांनी पोलिसांच्या भानगडीत पडण्याऐवजी अंत्यसंस्कार करून टाकले. परंतु सासूला संशय आल्यानंतर तिने सुनेला प्रश्न विचारले. तेव्हा ती घाबरली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. पती मकसूद आणि पत्नी मदीना यांचा विवाह ६ वर्षापूर्वी झाला होता. या दोघांना अपत्य नव्हतं. त्यामुळे सातत्याने दोघांमध्ये वाद सुरू असायचे. गावातच मकसूद ज्वेलरी मेकिंगचं काम करत होता.