पती, पत्नी आणि थेलियम नायट्रेटचा प्याला; रहस्यमयी हत्येचे देशातील दुसरे प्रकरण, पण फुटलेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:28 PM2022-12-12T12:28:03+5:302022-12-12T12:28:54+5:30

थेलियम नायट्रेटचा वापर करून झालेल्या हत्यांचे भारतातील हे दुसरे उदाहरण आहे.

husband, wife and cup of thallium nitrate; The second case in the country, but exposed | पती, पत्नी आणि थेलियम नायट्रेटचा प्याला; रहस्यमयी हत्येचे देशातील दुसरे प्रकरण, पण फुटलेच...

पती, पत्नी आणि थेलियम नायट्रेटचा प्याला; रहस्यमयी हत्येचे देशातील दुसरे प्रकरण, पण फुटलेच...

Next

- रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक
विष पाजून हत्या करायची पण पोलिसांना त्याचा मागमूसही लागू द्यायचा नाही, या इराद्याने आजवर जगभरातील आरोपींनी वेगवेगळ्या विषांचा प्रयोग केला असेल  पण थेलियम आणि अर्सेनिक या विषारी रसायनांचा वापर करून सांताक्रु्झ येथील काजल शाह या विवाहितेने हितेश जैन या आपल्या प्रियकराच्या मदतीने अलीकडेच केलेली पती आणि सासूची हत्या हे भयंकर प्रकरणातील एक ठरावे. आरोपींनी कितीही प्रयत्न केले तरी तो आपल्याच चुकीने पोलिसांच्या जाळ्यात सापडतो, हा आजवरचा पोलिसांचा अनुभव आहे. 

थेलियम नायट्रेटचा वापर करून झालेल्या हत्यांचे भारतातील हे दुसरे उदाहरण आहे. दोन दशकांपूर्वी चंद्रकांत सहस्रबुद्धे या आरोपीने राजेंद्रसिंग अवल यांची हत्या करण्याच्या हेतूने त्यांना शीतपेयातून पाजलेल्या थेलियम नायट्रेटची पहिली घटना खळबळजनक ठरली होती. राजेंद्रसिंग अवल यांना भिसीची लाखो रुपयांची रक्कम परत देण्याचे टाळण्यासाठी त्यांना शीतपेयातून थेलियम नायट्रेट पाजल्याचा आरोप पोलिसांनी सहस्रबुद्धेवर ठेवला होता. देशात कुठेही उपलब्ध नसलेल्या थेलियम नायट्रेटचा प्रयोग राजेंद्रसिंग यांच्यावर झाल्याचे शोधून काढणे, हेच त्यावेळी  डॉक्टर आणि पोलिसांसमोर आव्हान होते. 

शीतपेयातून थेलियम नायट्रेट प्यायल्यानंतर राजेंद्रसिंग यांची अवस्था घरच्यांना बघवत नव्हती. त्यांच्या हातापायातले त्राण निघून गेले होते. अतिसाराने ते हैराण झाले होते. शरीरातील उष्णता प्रचंड वाढली होती. वातानुकूलित वॉर्डमधील पंखे अहोरात्र सुरू ठेवूनही त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा अखंड वाहत होत्या. दोन-तीन दिवसात त्यांचे डोक्यावरचे, दाढीचे केस गळू लागले. मानसिक संतुलन ढासळून ते असंबंद्ध बडबड करू लागले होते. वेगवेगळे भास होऊ लागले. आणखी काही दिवसात दोन्ही ओठ फुटले आणि त्यातून रक्त ठिबकू लागले होते. ही लक्षणे नेमकी कोणत्या आजाराची हे डॉक्टरांच्या टीमना कळत नव्हते. 
अखेर एका ज्येष्ठ डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने जगातील सगळ्या विषांची लक्षणे शाेधून काढली तेव्हा त्यात थेलियमचे नाव पुढे आले. चौकशीअंती चंद्रकांतला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने राजेंद्रसिंगसह आणखी काही जणांवर थेलियम नायट्रेटचा प्रयोग केल्याचे आढळले. 

थेलियम नायट्रेटच्या वापराची कल्पना चंद्रकांतच्या डोक्यात कशी आली हेही तपासात उघड झाले. डिस्कव्हरी चॅनेलवर मेडिकल डिटेक्टीव्हज हा कार्यक्रम पाहत असताना त्यात परदेशातील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्यासाठी थेलियम नायट्रेटचा वापर केल्याच्या गुन्ह्याची माहिती होती. तो कार्यक्रम पाहून प्रभावित झालेल्या चंद्रकांतने मित्राच्या मदतीने प्रिन्सेस स्ट्रीट येथील एका कंपनीमार्फत ते स्वित्झर्लंडवरून मागवले होते. मासे पाळलेल्या एका तलावातील किडे मारण्यासाठी हे थेलियम नायट्रेट हवे असल्याचे कारण त्याने पुढे केले होते. 

जगात अनेक देशात थेलियम नायट्रेटसारखी जहाल विषारी रसायने विकण्यावर बंदी आहे. पण डिस्कव्हरी चॅनेलवरील कार्यक्रम पाहून अनेक देशात त्याचे अनुकरण केले गेले असावे. काजल शाह आणि हितेश जैन यांनी थेलियम आणि अर्सेनिकचा प्रयोग करून डिस्कव्हरी चॅनेलवर दाखवलेल्या घटनेची पुनरावृत्ती केली. सासूची हत्या पचल्यानंतर काजल शाहने प्रियकराच्या मदतीने पती कमलकांत शाह यांना लक्ष्य केले. थेलियममुळे  कमलकांत यांचे अवयव एकामागोमाग एक निकामी होत गेले. त्यांच्या रक्ताच्या चाचणीत थेलियम आणि अर्सेनिकचे प्रमाण कमालीचे वाढल्याने डॉक्टरांना संशय आला. दोन्ही घटनांमध्ये डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे थेलियमचा वापर स्पष्ट झाला आणि आरोपी गजाआड पोहोचले.

Web Title: husband, wife and cup of thallium nitrate; The second case in the country, but exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.