पतीसोबत भांडण झालं म्हणून पत्नीने घरात घडवून आणली 25 लाखांची चोरी, माहेरून बोलवले चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:24 PM2022-07-15T13:24:49+5:302022-07-15T13:25:20+5:30
Rajasthan Crime News : दौसामध्ये राहणारा विमलेश शर्माने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या बहिणीचे 17 लाख 50 हजार रूपये आणि त्याचे स्वत;चे 8 लाख रूपयांचे दागिने चोरीला गेले.
राजस्थानच्या (Rajasthan Crime News) दौसामध्ये एका महिलेने पतीसोबत वाद झाल्यानंतर घरातच चोरी घडवून आणली. पोलिसांना सूचना मिळाली होती की, शहरातील गिरिराज धरण मंदिराजवळ 17 लाख 50 हजार आणि 8 लाख रूपयांचे दागिने चोरी गेले. पोलिसांनी चौकशी केल्यावर जे पुरावे त्यांना सापडले ते पाहून पोलिसही हैराण झाले. पोलिसांना समजलं की, ही चोरी घराच्या मालकीनीनेच घडवून आणली. कारण तिचं तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. ही चोरी घडवून आणण्यासाठी तिने तिच्या माहेरच्या एका ओळखीच्या व्यक्तीची मदत घेतली.
दौसामध्ये राहणारा विमलेश शर्माने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या बहिणीचे 17 लाख 50 हजार रूपये आणि त्याचे स्वत;चे 8 लाख रूपयांचे दागिने चोरीला गेले. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांना संशय आला की, या चोरीत घरातीलच एखादा सदस्य सामिल असू शकतो. ज्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे पीडित विमलेश शर्माच्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.
चौकशी दरम्यान महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. ज्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे मुख्य आरोपी ऋषिकेश मीणा आणि रामकेश मीणाचा शोध घेण्यात आला. दोघेही महिलेच्या माहेरी पदमपुरामध्ये राहत होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडे 16 लाख 66 हजार 500 रूपये आणि दागिने आढळून आले.
सांगितलं जात आहे की, आरती शर्माचं माहेरही पदमपुरामध्ये होतं आणि आरोपी ऋषिकेशला ती आधीपासून ओळखत होती. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी आरती आणि तिचा पती विमलेश यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यामुळेच आरतीने ही चोरी घडवून आणली.