Hyderabad Honour Killing: तेलंगणात पुन्हा एकदा ऑनर किलिंग, भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:21 PM2022-05-05T15:21:44+5:302022-05-05T15:21:52+5:30
Hyderabad Honour Killing: घरच्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यामुळे हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
Honour Killing in Hyderabad:तेलंगणामध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध वेगळ्या धर्मात लग्न केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हैदराबादमधील सरुरनगर भागात ही घटना घडली आहे. या हत्येसाठी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पत्नीच्या कुटुंबीयांना जबाबदार धरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागराजू नावाचा युवक पत्नीसह दुचाकीवरून सरूरनगरकडे जात असताना दोन अज्ञातांनी त्यांना तहसीलदार कार्यालयाजवळ अडवले आणि सर्वांसमोर नागराजूवर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. नागराजूची पत्नी सुलतानाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात तिलाही काही जखमा झाल्या. यादरम्यान काही लोक तिथे जमा झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मुस्लिम तरुणीशी केले लग्न
नागराजू (25) यांने 4 महिन्यांपूर्वी 31 जानेवारी रोजी सय्यद अश्रीन सुलताना उर्फ पल्लवी (23) सोबत लग्न केले होते. दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नावर खूश नव्हते, त्यामुळेच दोघेही कुटुंबापासून वेगळे राहत होते. नागराजूच्या नातेवाइकांनी सांगितले की, दोघे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. नागराजू हिंदू आणि मुलगी मुस्लिम असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करून शिक्षा झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न झाले होते
मृत नागराजू हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लग्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून समुपदेशनही केले. दुसरीकडे या घटनेनंतर भाजपला हिंदू मुस्लिम राजकारण करण्याची संधी मिळाल्याने भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत नागराजू यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली.