मोलकरणीनं हार्पिक अन् झंडू बामनं बनवलं 'आय ड्रॉप'; वृद्ध महिला झाली अंध! असा होता तिचा प्लान...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:19 PM2022-03-04T13:19:57+5:302022-03-04T13:20:24+5:30
एका मोलकरणीनं ज्या घरात ती घरकाम करत होती त्याच घरात चोरीच्या उद्देशानं ७३ वर्षीय वृद्ध महिलेला अंध केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
एका मोलकरणीनं ज्या घरात ती घरकाम करत होती त्याच घरात चोरीच्या उद्देशानं ७३ वर्षीय वृद्ध महिलेला अंध केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केअरटेकरचं काम करणाऱ्या पी.भार्गवी नावाच्या या महिलेनं घरमालकीण वृद्ध महिलेला अंध करण्यासाठी चक्क हार्पिक आणि झंडू बाम वापरुन एक 'आय ड्रॉप' तयार केलं होतं. पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली असून तिनं गुन्हा कबुल केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ७३ वर्षीय हेमवती नचाराम या श्रीनिधी अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. लंडनमध्ये वास्तव्याला असणाऱ्या त्यांचा मुलगा शशिधर यांनी ऑगस्ट २०२१ रोजी भार्गवी हिला त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून नियुक्त केलं होतं. भार्गवी तिच्या सात वर्षांच्या मुलीसह हेमवती यांच्या फ्लॅटमध्ये राहत होती.
असं तयार केलं 'आयड्रॉप'
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा हेमवती यांना डोळे चोळताना मोलकरणीनं पाहिलं तेव्हा तिनं आपण एक असं आयड्रॉप टाकू की ज्यानं आराम मिळेल असं हेमवती यांना सांगितलं. त्यानंतर भार्गवी गपचूप बाथरुममध्ये गेली आणि बाथरुम क्लिनर हार्पिक आणि झंडू बाम पाण्यात मिसळून एक मिश्रण तयार केलं. डोळ्यांना आराम देणारं लिक्विड असल्याचं सांगून तिनं हेमवती यांच्या डोळ्यात ते टाकलं. चार दिवसांनी हेमवती यांनी आपल्या मुलाला डोळ्यांत कसलं तरी संक्रमण झाल्याचं कळवलं. त्यानंतर शशिधर यांनी नजिकच्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं. याच दरम्यान मोलकरीण भार्गवी हिनं डाव साधला आणि घरातील ४० हजार रुपके रोखरक्कम, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोनसाखळी तसंच इतर काही मौल्यवान वस्तू घेऊन ती पसार झाली.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
जेव्हा हेमवती यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांची मुलगी उषाश्री त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात घेऊन गेली. पण हेमवती यांचं दुखणं काही थांबलं नाही. हेमवती यांच्या दृष्टी हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि त्या पूर्णपणे अंध झाल्या. त्यानंतर शशिधर यांनी हैदराबादला आले आणि आईला एल.व्ही.प्रसाद नावाच्या डोळ्यांच्या रुग्णालयात तिला घेऊन गेले. त्यानंतर डोळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे त्या दृष्टीहिन झाल्याचं निष्पन्न झालं
मोलकरणीला अटक
कुटुंबीयांना मोलकरीण भार्गवीवर संशय आला. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. चौकशीअंती भार्गवीनं आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी तिला अटक केली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे.