हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर खटला चालविण्याची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:31 AM2022-05-21T06:31:53+5:302022-05-21T06:32:23+5:30
हे ग्राह्य धरून पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ‘दिशा बलात्कार व हत्या’ प्रकरणातील आराेपींचे एन्काउंटर बनावट असल्याचे याप्रकरणी स्थापन केलेल्या न्यायालयीन चाैकशी आयाेगाने म्हटले आहे. आराेपींचा मृत्यू व्हावा, या हेतूनेच गाेळीबार करण्यात आल्याचा ठपका आयाेगाने पाेलिसांवर ठेवला आहे. याप्रकरणी दहा पाेलिसांवर हत्येप्रकरणी खटला चालविण्यात यावा, अशी शिफारसही आयाेगाने केली आहे. हे ग्राह्य धरून पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले.
२०१९मध्ये एका पशुवैद्यकीय डाॅक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळण्यात आले हाेते. पाेलिसांनी याप्रकरणी चार आराेपींना अटक केली हाेती. मात्र, घटनास्थळावर आराेपींना पहाटे ५ वाजेच्या सुमारास आणले असता त्यांना चकमकीत गाेळ्या घालून ठार करण्यात आले हाेते. चकमकीची चाैकशी करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवृत्त न्या. व्ही. एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयाेगाची स्थापना करण्यात आली हाेती. त्यांनी सविस्तर अहवाल सर्वाेच्च न्यायालयात सादर केला हाेता. याबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा काेहली यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण यांनी हा अहवाल सीलबंद ठेवावा, अशी मागणी केली हाेती. मात्र, ती न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले, की हे चकमकीचे प्रकरण आहे.
आयाेगाचे निरीक्षण काय?
- मृत्यू हाेईल या हेतूनेच आराेपींवर गाेळीबार करण्यात आला हाेता.
- चारपैकी तीन आराेपी अल्पवयीन हाेते. तपासामध्ये अनेक त्रुटी हाेत्या.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्या. रेखा बाल्दाेडा आणि सीबीआयचे माजी संचालक डी. आर. कार्तिकेयन यांचा आयाेगामध्ये समावेश हाेता.