नवा सायबर क्राइम: चालता-फिरता रेकॉर्ड करतात मुलींचे व्हिडिओ, Instagram वर अपलोड करत बदनामीचा 'उद्योग'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:01 PM2022-10-13T19:01:34+5:302022-10-13T19:03:09+5:30
हैदराबादमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवर तरुणींचे आणि महिलांचे व्हिडिओ अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हैदराबाद-
हैदराबादमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवर तरुणींचे आणि महिलांचे व्हिडिओ अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांच्या टीमची मदत घेतली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटच्या ऑपरेटरचा शोध घेऊन त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम पेज चालवणारी ही टोळी परिसरातील तरुणींना लक्ष्य करत आहे. तरुणी सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्यासोबत गप्पा मारत असतानाचे क्षण टोळीतील नराधम तरुण मोबाइल कॅमेरात कैद करतात. त्यानंतर संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करुन अपमानजनक आणि आक्षेपार्ह कॅप्शनसह पोस्ट केले जात होते. या अकाऊंटचे जवळपास १४ हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स देखील आहेत. या पेजवर तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो आक्षेपार्ह कॅप्शनसह अपलोड केले गेले आहेत.
इतकंच नव्हे, तर तरुणींचे असेच व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना पाठवण्याचं आवाहन देखील या टोळक्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केलं आहे. रस्त्यावर फिरताना, बागेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणचे तरुणींचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन आम्हाला पाठवा असं आवाहन या पेजवरुन करण्यात आलं आहे. या अकाऊंटवर अनेक आपत्तीजनक पोस्ट देखील आहे. ज्यात तरुणींची बदनामी करण्यात आली आहे.
९०० हून अधिक लोक व्हिडिओ रेकॉर्ड करुन करतात अपलोड
पोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की या अकाऊंटसाठी ९०० हून अधिक लोक व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटला लिंक करतात. त्यामुळेच या अकाऊंटचे दिवसेंदिवस फॉलोअर्स देखील वाढत आहेत. पोलिसांकडे हे प्रकरण पोहोताच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.
हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटप्रकरणात तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांनी कलम ५०६, ५०९, ३५४ (डी) आणि आयटी अधिनियम (६४) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. हैदराबाद सायबर क्राइम टीमनं इन्स्टाग्राम अकाऊंटच्या अॅडमिनची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे.