गुन्ह्यांचे अर्धशतक केल्याचा मला अभिमान आहे, आरोपीचे न्यायालयात वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:07 PM2018-10-03T21:07:46+5:302018-10-03T21:08:12+5:30
निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचे" सांगितले. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे
मुंबई - मुंबईत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी त्याच्या ५० व्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायाधीशांनी त्याला चोरी न करण्याचे आवाहन करत समजवण्याचा प्रयत्न केला असता. त्याने निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचे" सांगितले. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे. मात्र, मंगलमध्ये सुधारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. चोरीचे पैसे जुगारात आणि दारू पिण्यात तो उडवायचा. कांजूरमार्ग पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावर सराईत गुन्ह्यांची नोंदी बघता न्यायाधीशांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगलने निर्लजपण्णे 'आज मी गुन्ह्यांची अर्ध सेंच्युरी केल्याचे कळले. मला त्याचा अभिमान ही असल्याचे सांगितले" या नंतर न्यायाधीशांनी त्याला ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कांजूरमार्ग परिसरात राहणारा मंगल उर्फ मंगल्या कमलाकर खरात (वय २२) याने एप्रिल महिन्यात कांजूरमार्गच्या फ्रेंड्स काॅलनीतील प्रगती अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सेवा निवृत्त विजया जाधव यांच्या घरी घरफोडी केली होती. विजया यांच्या घरातून त्याने तब्बल २१ तोळे सोने चोरले होते. या प्रकरणी विजया यांनी कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. अशाच घरफोडीच्या गुन्ह्यात मंगलला पवई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ताबा कांजूरमार्ग पोलिसांनी घेतला. पोलिस तपासात मंगलवरील हा ५० वा गुन्हा असल्याचे निदर्शनास आले. मंगल विरोधात आतापर्यंत पवई, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आणि इतर पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.