अपुर्ण दोषारोपपत्र दाखल केल्याने जामिनास पात्र : अॅड. सुरेंद्र गडलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:46 PM2018-11-20T12:46:59+5:302018-11-20T12:51:23+5:30
पोलिसांनी केवळ सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यासाठी घाईने अपुरे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
पुणे : अर्धवट दोषारोपत्र दाखल झाले असेल तर मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे एल्गार व कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी अॅड. सुरेद्र गडलिंग यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. निषेध नोंदवून दोषारोपपत्र स्विकारत असल्याची तक्रार त्यांनी केली.
याप्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिसांनी ९० दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानुसार विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी मुदतवाढ दिली होती. मात्र, तांत्रिक अडचण असतानाही दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याने त्याला पाचही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने पाचही जणांचा अर्ज मान्य करताना सत्र न्यायालयाने दिलेली मुदत वाढ चुकीचे असल्याचे नमूद केले होते. त्यावर पुणे पोलीस तत्काळ सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या अर्जावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर तारीख ठेवली होती. मात्र त्या आधीच सत्र न्यायालयाकडून अॅड. गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यान, एल्गार परिषदेत झालेल्या भाषणांमुळेच कोरेगाव भीमा हिंसाचार घडल्याचे व त्यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी १५ नोव्हेंबर रोजी म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील तारखेच्या अगोदर सायंकाळी सहा वाजता न्यायालयात दाखल केले असल्याचे अॅड. गडलिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दाखल केलेले दोषारोपपत्र व कागदपत्रे अद्यापपर्यंत मला मिळाली नसल्याचेही सांगितले. त्यावर जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काही कागदपत्रे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे. ती मिळताच ती गुन्ह्यातील संशयीत आरोपींना पुरविण्यात येईल असे सांगितले. त्यावर अॅड. गडलिंग म्हणाले, पोलिसांनी केवळ सर्वोच्च न्यायालयात दाखविण्यासाठी घाईने अपुरे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ९० दिवसांत मला दोषारोपत्राची पूर्ण कॉपी मिळणे आवश्यक होते. पोलिसांनी जर अपुरे दोषारोपत्र दाखल केले असेल तर मी डिफॉल्ट जामीन मिळण्यास पात्र असल्याचा युक्तिवाद केला.
.....................
कोठडी न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली
सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्वीस यांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तर महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाचे म्हणणे सादर करून त्यावर २२ नोव्हेंबरला युक्तीवाद करणार असल्याचे न्यायालयास सांगितले.