पोलिसांच्या अत्याचारामुळे मी गुन्हेगार झालो!, कुख्यात रिंदा याने मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:14 PM2021-06-24T21:14:29+5:302021-06-24T21:15:08+5:30
Crime News : नांदेडसह पंजाब राज्यात अनेक गुन्ह्यांसाठी हवा असलेला आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याने नांदेडमध्ये अनेकांचा खून केला तसेच प्रतिष्ठित मंडळींकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली होती.
नांदेड - नांदेडमध्ये कांही पोलीसांनी माझ्या नावावर खंडणी वसुल केली. त्यातील एक पोलीस सध्या तुरूंगात आहे. मी सत्यासाठी लढल्यामुळे मला पोलीसांनी गुन्हेगार बनवले असा खुलासा कुख्यात दहशतवादी हरविंद सिंग रिंदा याने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. नांदेडसह पंजाब राज्यात अनेक गुन्ह्यांसाठी हवा असलेला आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याने नांदेडमध्ये अनेकांचा खून केला तसेच प्रतिष्ठित मंडळींकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली होती.
पंजाबमधील एका माध्यमाने ही मुलाखत घेतली आहे, त्यात रिंदा म्हणतोय 2008 मध्ये बिदर(कर्नाटक) पोलीसांनी नांदेड येथील काही युवकांवर केलेला अन्याय सांगितला. त्यामुळे माझ्या मनात खऱ्यासाठी लढण्याची मानसिकता तयार झाली आणि मी तशी सुरूवात केली. त्यानंतर मी पंजाबमध्ये आलो. येथील राजकारणाचा बळी ठरलो आणि तुरूंगात गेलो. सात वर्ष तुरूंगात असतांना तुरूंगात मादक पदार्थ पुरवठा करणाऱ्यांविरुध्द तुरूंगातून लढा दिला. मला पोलीसांनी गुन्हेगार बनवले याचे उदाहरण सांगतांना रिंदा सांगत होता की, मी एक खून केला. मरणारा व्यक्ती कोण्या तरी मोठ्या व्यक्तीचा नातलग होता. मी माझी बाजू पोलीसांसमक्ष सांगून हजर झालो होतो. पण पोलीसांनी माझ्यासोबत केलेला अन्याय त्याने वर्णन केला तेंव्हा एका महिला अधिकाऱ्यासमक्ष मला हजर केले होते तेव्हा तिला माझ्या शरीरावरील जखमा पाहता आल्या नाहीत असे सांगितले.
नांदेडमध्ये मी एक खून केला. हे त्याने आपल्या मुलाखतीत मान्य केले. माझ्या बंधूच्या खूनामधील आरोपी माझ्या भाऊ आणि वडिलांविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. असाही उल्लेख केला. नांदेडमध्ये रिंदाचा बंधू सत्याचा खून झाला होता. त्याप्रकरणातील आरोपींपैकी फक्त एकाला शिक्षा झाली इतरांची पुराव्या अभावी सुटका झाली आहे.नांदेडमध्ये अशी ख्याती आहे की, रिंदाने दोन खून केले असे नांदेडमध्ये म्हटले जाते परंतु या मुलाखतीत त्याने एकाच खुनाची कबुली दिली.
मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने रिंदाला तु अनेकांकडून खंडण्या वसुल केल्याचा प्रश्न विचारला तेंव्हा अत्यंत बेधडकपणे रिंदा सांगत होता मी दोन नंबरच्या लोकांकडून खंडण्या घेतल्या आहेत. सोबतच रिंदाने सांगितलेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये कांही पोलीसच माझ्या नावाने खंडण्या वसुल करत होते. त्यातील एक पोलीस निरिक्षक मकोका कायद्याअंतर्गत सध्या तुरूंगात असल्याचे तो म्हणाला. मला पोलीसांवर विश्र्वास नाही. मी घेतलेल्या अनुभवाप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्यासमक्ष मी सर्व हकीकत सांगून, आपला गुन्हा कबुल करून हजर झालो होतो पण नंतर तो पोलीस अधिकारी बदलला आणि माझ्यावर अन्याय झाला. असा खळबळजनक दावा रिंदा ने केला आहे. रिंदा याच्या मुलाखतीने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये आजही रिंदा ची दहशत कायम आहे.