“मैं नहीं रुक सकता, जाना जरुरी है”; मृत प्रशांत बारेकर यांचे भाचीसोबत अखेरचे बोलणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:05 AM2021-12-24T07:05:26+5:302021-12-24T07:05:51+5:30
मामा, तू कामावर नको जाऊ, अशी विनंती भाचीने केली होती.
गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मै रुक नही सकता, जाना जरुरी है’ असे म्हणत माझा मामा गेला आणि परत तो त्याचा मृतदेह. माझा मामा कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, त्याच्या बायका पोरांचे आता काय होणार’? असा प्रश्न विचारत जान्हवी पटेल रडू लागल्या. गोराईत कार अपघातात मृत झालेले प्रशांत बारेकर हे त्यांचे मामा होते. या घटनेने बारेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बारेकर हे कांदिवली पूर्व हायवे परिसरात राहतात. त्यांच्या बहिणीची मुलगी जान्हवी त्यांना भेटायला बुधवारी आली. ते ११ डिसेंबर रोजी ‘बे व्हियू’ हॉटेलमध्ये रुजू झाले. त्यांच्या घरी पत्नी सोनम आणि मुले हर्मन (१३) व ध्वनी (८) असा परिवार आहे. जान्हवी यांना बुधवारी ते भेटले. तेव्हा मामा, तू कामावर नको जाऊ, अशी विनंती तिने केली. मात्र मी थांबू शकत नाही, जाणे गरजेचे आहे असे उत्तर देत बारेकर निघाले. त्यांना घरी लवकर जाण्याची परवानगी हॉटेलने दिली. मात्र, ग्राहक असल्याने ते थांबले आणि काम संपवून परतताना त्यांना काळाने गाठले.
वाढदिवसानिमित्त दिलेली पार्टी ठरली जीवघेणी
कारमध्ये बसलेल्या आदित्य या मुलाचा बुधवारी बर्थ डे होता. त्यासाठी त्याने पार्टी दिली होती. पार्टी करून हे सर्व परतत असताना हा अपघात झाला. यात मृत मुलगी अभिगेल जाधव (२१) ही महाविद्यालयात शिकत होती. चारकोपच्या सेक्टर २ मध्ये ती राहत होती. या अपघाताचे समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना देखील जबर धक्का बसला असून, या परिसरात शोककळा पसरली असल्याचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी सांगितले.