"मी तिला विसरू शकत नाही..."; सुसाईड नोट लिहून पतीनं स्मशानभूमीतच घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:39 PM2021-08-12T15:39:08+5:302021-08-12T15:41:34+5:30
बालोद पोलीस ठाण्यात टेकापार येथील रहिवासी मनीष नेताम याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली.
लग्नाच्या २ महिन्यातच पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का पोलीस पती पचवू शकला नाही म्हणून त्यानेही स्वत:चा जीव दिला. ज्याठिकाणी पत्नीचे अंत्यसंस्कार झाले होते तिथेच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्द्रयद्रावक घटना छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी पत्नीचा विरह सहन न झाल्यानं पतीनं आत्महत्या केली आहे.
बालोद पोलीस ठाण्यात टेकापार येथील रहिवासी मनीष नेताम याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. मृतक मनीष नेताम धमतरी जिल्ह्यातील बोरई ठाण्यात कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वीच मनीषचं लग्न झालं होतं. १७ दिवसांपूर्वी घरात लावलेल्या टाइल्सवरुन घसरुन त्याची पत्नी हेमलता हिचा मृत्यू झाला. २ महिन्यापूर्वी विवाह बंधनात अडकलेले पती-पत्नीचं एकमेकांवर खूप प्रेम होते.
पत्नीच्या मृत्यूनंतर पती मनीष नेताम प्रचंड नैराश्येत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर पती मनीष कुणाशीही बोलत नसे. इतकचं नाही तर गावकऱ्यांच्या माहितीनुसार, पत्नीच्या अचानक निधनानं मनीष खूप खचला होता. त्याला हा धक्का सहन झाला नाही. पत्नीच्या आठवणीत तो दररोज ज्याठिकाणी पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तिथे जायचा आणि रडत होता.
नेहमीप्रमाणे बुधवारी मनीष अंत्यस्थळी पोहचला आणि तिथे जाऊन त्याला अश्रू अनावर झाले. काही वेळानंतर शेजारून जाणाऱ्या व्यक्तीने एका झाडाला मनीषचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. मनीषने गळफास घेतला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअपवर सुसाईड नोट त्याच्या भावाला पाठवली होती. आत्महत्येची बातमी कळताच गावात सर्वत्र खळबळ माजली.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
सुसाईड नोटमध्ये पती मनीष नेतामनं लिहिलं होतं की, केवळ २ महिनेच आमच्या लग्नाला झाले होते. मी लताला विसरू शकत नाही. इतक्या मेहनतीनं घरातील सर्वांनी मिळून नवीन घर बनवलं होतं आणि लग्न केले होते. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण देवाच्या मनात काय चाललं होतं कुणास ठाऊक. त्यासाठी आता मला या घरात राहण्याचं मन नाही.
तसेच छोटू, पापा आणि दीदीला सांगा, मला माफ करा. लताची जबाबदारी माझ्यावर दिली होती ती निभावू शकलो नाही. हा फोन लताने मला गिफ्ट केला होता. माझी इच्छा आहे की हा फोन छोटूने वापरावा. मला माहित्येत तो नकार देईल. पण त्याला सांगा माझी गोष्ट नक्की ऐक. मनीष नेताम याच्यावर अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी केले जिथं त्याच्या पत्नीवर १७ दिवसांपूर्वी मुखाग्नी दिला होता. संपूर्ण गाव हे दृश्य पाहून हळहळला. मनीष आणि हेमलता यांचे प्रेम अमर झाले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. सुसाईड नोटनंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.