पैसे मला नको, हवाला ऑपरेटरला दे.... जीएसटी आयुक्ताने मागितली लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:23 AM2022-10-25T08:23:45+5:302022-10-25T08:24:10+5:30
या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, द पवन एन्टरप्राईज या कंपनीने नॉर्थ ईस्ट मात्र, फ्रण्टियर रेल्वेच्या एका प्रकल्पाचे काम केले.
मुंबई : अपील प्रकरणाचा निकाल तुझ्या बाजूने देतो; पण त्यासाठी वादग्रस्त रकमेच्या दहा टक्के रक्कम मला हवी. पण पैसे मला नको देऊ, माझा माणूस हवाला ऑपरेटर आहे. त्याला कमिशनसकट दे, अशी मागणी करणाऱ्या जीएसटी विभागाच्या आयुक्ताला सीबीआयने अटक केली आहे.
या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, द पवन एन्टरप्राईज या कंपनीने नॉर्थ ईस्ट मात्र, फ्रण्टियर रेल्वेच्या एका प्रकल्पाचे काम केले. कामाची सर्व बिले कंपनीने रेल्वेच्या उप-अभियंत्याकडे दिली. त्यानंतर कंपनीच्या मालकाला या प्रकल्पाच्या अनुषंगाने ४८ लाख ४३ हजार रुपयांचे करदायित्व असल्याची नोटीस जीएसटी विभागाने बजावली.
मात्र, या कामावरील आर्थिक व्यवहार करमुक्त असल्याचे संबंधितकंपनीच्या मालकाने जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, अधिकारी हे ऐकून घेत नव्हते. परिणामी, पवन कंपनीच्या मालकाने जीएसटीच्या अपील विभागाच्या आयुक्तांकडे दाद मागितली. अपील विभागाचे आयुक्त राजू शक्तिवेल या अधिकाऱ्याने राजेंद्र नावाच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून पवन कंपनीच्या मालकाला तुझ्या बाजूने निर्णय देतो ४८ लाख रुपयांच्या दहा टक्के रक्कम मला दे असा निरोप पाठवला.
कंपनीच्या मालकाने यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार दिली. सीबीआयने सापळा रचून मालकाने आयुक्ताला लाच द्यावी असे सुचवले. पवन कंपनीच्या मालकाने सीबीआयच्या सूचनेवरून व्यवहार केला. त्यानंतर सीबीआयने आयुक्तावर अटकेची कारवाई केली.