शहरभर 'आय लव्ह यू' लिहिणं पडलं महागात; प्रेमात वेडा झालेला CA पोहोचला तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:24 PM2019-01-10T18:24:24+5:302019-01-10T18:29:32+5:30
केतन शहा हा व्यवसायाने सीए आहे. मात्र, प्रेमसंदेश लिहून तो एका महिलेला नाहक त्रास देत होता.
मुंबई - प्रेमापोटी एका महिलेसाठी भिंतीवर, रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर प्रेमसंदेश एका उच्च शिक्षित पुरुषाने लिहिल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय केतन शहा याला चेंबूर पोलिसांनीअटक केली आहे. या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार संबंधित महिलेने डिसेंबरमध्ये पोलिसांकडे केली होती. केतन शहा हा व्यवसायाने सीए आहे. मात्र, प्रेमसंदेश लिहून तो एका महिलेला नाहक त्रास देत होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून शहा भिंतींवर 'आय लव्ह यू' असे प्रेमसंदेश लिहून तक्रादार महिलेला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार दाखल केली. ती ज्या ज्या ठिकाणी वावरत असे त्याठिकाणी तिला हे संदेश दिसायचे. यापैकी काही संदेशांमध्ये तिचं नावाचा देखील उल्लेख करण्यात आला होता. तरीदेखील तिने दुर्लक्ष केलं. मात्र एकेदिवशी ती राहत असलेल्या इमारतीच्या भिंतीवरही प्रेमसंदेश लिहिलेले तिला आढळले. हे सर्व कोण करत आहे याबाबत महिलेला कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर मात्र, तिने पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तिने तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रेमसंदेशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी संदेश लिहिले होते त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून त्यांना शहाच्या गाडीचा नंबर कळला. त्यानंतर तो संदेश लिहित असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. सध्या शहा पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.