‘आय लव यू बोल डाल’ अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेन; तरुणीला धमकी
By प्रदीप भाकरे | Published: February 26, 2023 02:58 PM2023-02-26T14:58:26+5:302023-02-26T14:59:16+5:30
याद राख, तरूणीला गर्भित धमकी : मॉर्फिंग केलेला व्हिडिओ पाठविला
अमरावती - माझ्याशी बोलली नाहीस, आय लव यू म्हटले नाहीस, तर फेसबुकवर व्हिडिओे टाकून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरूणीच्या छायाचित्रांचे मॉर्फिंग करून आक्षेपार्ह व्हिडिओ बनविल्याची धक्कादायक बाब फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २३ ते २४ फेब्रुवारीदरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका मोबाईलधारकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यात महिलांचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर महिलांना व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. पण, या सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात महिलांकडून व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे त्या सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरत चालल्या आहेत. फेसबुकवर टाकलेले फोटोचा गैरवापर करून त्रास देणे, बनावट अकाउंट काढून अश्लील पोस्ट टाकणे, इन्स्टाग्रामवरील फोटो चोरून मॉर्फ करत त्रास देणे, सोशल मीडियावर मोबाइल क्रमांक टाकणे, मॅट्रीमोनी साइटवरून फसवणूक, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून त्रास देणे, अशा प्रकारच्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक प्रकार येथील एका महिलेसोबत घडला.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास स्थानिक एका महिलेच्या व्हाट्सॲपवर आरोपीने वारंवार मॅसेज, फोन कॉल, व्हिडिओ कॉल केले. तिची इच्छा नसताना ओळख वाढविण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन पाठलाग केला. तसेच व्हॉट्सॲपवर ‘आय लव यू’ असे मॅसेज केले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने फोन कर किंवा एसएमएस कर नाहीतर तुझ्या घरी येईल असे देखील मॅसेज केले. भविष्यात तू जर माझ्यासोबत बोलली नाहीस, तर फेसबुकवर व्हिडिओ टाकून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्य मोबाईल धारकाने स्वत:चा फोटो महिलेच्या फोटोसोबत जोडून व्हिडिओ तयार केला. तो फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर पाठविला. अवघ्या २४ तासात घडलेल्या त्या छळमालिकेमुळे ती प्रचंड विमनस्क झाली. अखेर तिने शुकवारी सकाळीच फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.
नणंद, भावजयीच्या फोटोखाली अश्लिल लिखाण
अन्य एका घटनेत इन्स्टाग्राम अकाउंटवर नात्याने नणंद भावजयी असलेल्या दोन महिलांचे फोटो अपलोड करून त्या फोटोखाली अश्लिल लिखाण करण्यात आले. तथा काही वैयक्तिक फोटो शेअर करून बदनामी करण्यात आली. आरोपीच्या त्या कृत्यामुळे आपल्यासह आपल्या वहिणीची बदनामी झाल्याची तक्रार एका २७ वर्षीय महिलेने येवदा पोलिसांत नोंदविली आहे. २० फेब्रुवारी रोजी घडलेल्या त्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी धनराज इंगळे (रा. कालवड, ता. शेगाव) याच्याविरूध्द विनयभंग, बदनामी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.