माझ्यावर बलात्कार होईल वा, मला जीवे मारतील; भाजपच्या महिला प्रभारीची पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:30 PM2023-01-06T13:30:50+5:302023-01-06T13:32:26+5:30
भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया प्रभारी ऋचा राजपूत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आपणास जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे
देशात सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे राजकीय वातावरण अधिकच बिघडल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सोशल मीडियातील वादाचे पडसाद हे प्रत्यक्ष मारहाणीत आणि गुन्हेगारी घटनांमध्ये होत आहेत. त्यात, राजकीय पक्षांचे समर्थक एकमेकांना भिडतानाही दिसून येते. आता, लखनौमधील भाजपा युवा मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख डॉ. ऋचा राजपूत यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समाजवादी पार्टी मीडिया सेल नावाच्या ट्विटर हँडलवरुन आपणास रेप आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल कली असून थेट युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाच जबाबदार धरले आहे.
भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया प्रभारी ऋचा राजपूत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आपणास जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे, मलाही काहीही झाल्यास त्याची जबाबदारी ही समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव यांची राहिल, असेही त्यांनी म्हटलंय. ऋचा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हतरजगंज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
ऋचा राजपूत यांनी स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी पोलिसांकडे सुरक्षाही मागितली आहे. मी तिरस्कारचा सामना करत असून माझे कुटुंबीयही भयभीत झाले आहे. माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कारही केला जाऊ शकतो. त्यामुळे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांस काहीही झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी अखिलेश यादव यांची राहिल, असेही ऋचा यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन अभद्र भाषेचा वापर माझ्याबद्दल करण्यात येत आहे. त्यामध्ये, सपा मीडिया सेल नावाच्या अकाऊंटचा समावेश असून या अकाऊंटवर यापूर्वीही गलिच्छ भाषा वापरण्यात येत असल्याचा आरोप केला होता. विभूती खंड पोलिस ठाण्यात प्रमोदकुमार पांडे यांनी या अकाऊंबद्दल तक्रार दिली होती. एका महिला पत्रकारानेही या अकाऊंटबद्दल तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून याप्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे सेंट्रल झोनच्या डीसीपी रजत कौशिक यांनी म्हटले आहे.