'माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो, चुकीचं काहीच केलं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:36 PM2021-09-28T15:36:55+5:302021-09-28T15:39:15+5:30
Anil Parab reaches ED office in Mumbai : दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला.
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली होती. त्यानुसार परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहचले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की, मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. मी ईडी कार्यालयात जात असून मी त्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करणार असे देखील परब यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली. पण ते या चौकशीला हजर राहणार की गैरहजर याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, आज ते ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत.
ईडीने परब यांना शुक्रवारी दुसरे समन्स बजावले. त्यात मंगळवारी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली. यापूर्वी २९ ऑगस्टला पहिल्यांदा दिलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून चौकशीस हजर राहावे, असे नमूद केले होते. मात्र, परब यांनी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे. त्यानुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.