पळालो नाहीच, पळवले गेले, ‘त्या’ सर्वांची नावे सांगणार; ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:40 AM2023-10-19T06:40:22+5:302023-10-19T06:40:41+5:30
ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पोलिसांना सतत गुंगारा देणारा ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील (३७) याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. यामागे कोणाचा हात आहे, त्या सर्वांची नावे सांगणार, असा दावा केल्याने खळबळ उडाली. ललितला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता. ललित पळून गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप वाढले. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिकच्या एमआयडीसी परिसरात अलीकडेच ३०० कोटींचा १५० किलो मेफेड्रॉन जप्त केले. हा कारखाना ललित पाटीलचा भाऊ भूषण याच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
असा काढला माग...
पुण्यातून पळ काढल्यानंतर ललितने चाळीसगाव गाठले. तेथून धुळ्याला जाऊन भाडेतत्त्वाने वाहन घेतले. तेथून छत्रपती संभाजीनगरमार्गे गुजरातमधील जामनगरमध्ये गेला. पाटील यांचे गुजरातमध्ये काही नातेवाईक आहेत. त्यांच्या मदतीने सोलापुरात आला. पुढे, विजापूरमार्गे कर्नाटक गाठले. विजापूरनंतर तो चन्नासंद्रा गावात गेला. पोलिस त्याच्या नातेवाइकांवर लक्ष ठेवून होते.
अशी केली अटक
ललित पाटीलच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री बंगळुरूजवळील चन्नासंद्रा येथील हॉटेलमधून पाटीलला ताब्यात घेत अटक केल्याची माहिती सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.
बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ललितचा भाऊ भूषणचाही ताबा पोलिस घेणार असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
याप्रकरणी पाटीलसह आतापर्यंत १५ आरोपींना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीच्या अटकेनंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांच्या दृष्टीनेही तपास करणार आहोत, असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
सर्व लागेबांधे बाहेर येणार
ललित पाटील याच्या अटकेनंतर मोठे लागेबांधे बाहेर येऊन बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार आहेत. ललित आज काय बोलतोय, यापेक्षा जे लागेबांधे बाहेर येणार आहेत, ते महत्त्वाचे असणार आहेत. तसेच, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री