मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:16 PM2023-03-30T22:16:03+5:302023-03-30T22:17:21+5:30

"माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला भाकरी नाही...;सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल."

IAS grandparents commit suicide by writing suicide note in haryana says Children have crores of wealth but not even 2 loaves to give me | मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

googlenewsNext

हरियाणातील चरखी दादरी येथून एक मन सुन्न करणारी घटना समो आली आहे. येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांनी कुटुंबाकडून होणाऱ्या हेटाळणीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, जी त्यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली. "माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला भाकरी नाही," असे या नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी संबंधित कुटुंबातील मुलगा, दोन सून आणि पुतण्या या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गोपी येथील रहिवासी असलेले जगदीश चंद्र आणि भागली देवी हे त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्या जवळ बाढडा येथे राहत होते. वीरेंद्र आर्य यांचा मुलगा विवेक आर्य 2021 मध्ये आयएएस झाला असून त्याला हरियाणा कॅडर मिळाली आहे. जगदीश चंद्र आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या बढडा येथील राहत्या घरी विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर रात्री उशिरा साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास जगदीश चंद्र यांनी विष खाल्ल्याची माहिती पोलिस कंट्रोल रूमला दिली. यानंतर ईआरवी 151 घटनास्थळी दाखल झाले आणि बढडा पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

मरण्यापूर्वी पोलिसांना दिली सुसाइड नोट -
जगदीशचंद्र यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोट पोलिसांना दिली. प्रकृती बिघडल्याने वृद्ध दाम्पत्याला प्रथम बढडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. मात्र येथे दादरी रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात पोहोचून पोस्टमॉर्टमसंदर्भात कागदोपत्री कारवाई केली. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.

'शिळी भाकरी आणि खराब दही खायला देत' -
सुसाईड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी म्हटले आहे, "मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझी व्यथा सांगतो. माझ्या मुलांची बढड्यात 30 कोटींची संपत्ती आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकरीही नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. 6 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. काही दिवस त्याच्या पत्नीने भाकरी दिली, पण नंतर तिने चुकीचे काम करायला सुरुवात केली. तिने माझ्या पुतण्याला सोबत घेतले. मी विरोध केला, हे त्यांना आवडले नाही. कारण मी असताना ते दोघेही चुकीची कामे करू शकत नव्हते. यामुळे त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर काढले. मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो आणि परत आलो, तर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला आणि आम्ही आमच्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागलो.

'सरकारने आणि समाजाने यांना शिक्षा करावी' -
आता त्यांनीही ठेवण्यास नकार दिला आणि शिळ्या भाकरी आणि शिळे व खराब दही द्यायला सुरुवात केली. हे विष किती दिवस खाणार म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली. माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सूना, एक मुलगा आणि एक पुतण्या आहेत. या चौघांनी माझ्यावर जेवढे अत्याचार केले तेवढे अत्याचार कोणत्याही मुलाने आपल्या आई-वडिलांवर करू नयेत. सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बँकेत माझ्या दोन एफडी आणि बढडा येथे दुकान आहे, ते आर्य समाज बढडा यांना देण्यात यावे.

चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल -
याप्रकरणी बढडा पोलीस ठाण्यातील एएसआय आणि तपास अधिकारी पवन यांनी सांगितले की, पोलिसांनी गुरुवारी रुग्णालयात जावून पोस्टमॉर्टमसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची कारवाई केली. यानंतर, वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. तसेच सुसाईड नोटच्या आधारे कुटुंबातील चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.


 

Web Title: IAS grandparents commit suicide by writing suicide note in haryana says Children have crores of wealth but not even 2 loaves to give me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.