२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 10:20 AM2024-10-03T10:20:19+5:302024-10-03T10:32:32+5:30
राजस्थानच्या कोटा विभागाचे कमिश्नर राजेंद्र विजय यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी राज्यात चार ठिकाणी छापे टाकले.
राजस्थानच्या कोटा विभागाचे कमिश्नर राजेंद्र विजय यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी राज्यात चार ठिकाणी छापे टाकले. IAS अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरील तपासादरम्यान, एसीबीला २ लाखांपेक्षा जास्त रोख, ३०० ग्रॅम सोने, ११ किलो चांदी आणि १३ प्लॉटसह अनेक कागदपत्रं सापडली. त्यानंतर सरकारने त्यांना पदावरून हटवलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या माहितीनंतर कोटा येथील दोन आणि जयपूरमधील एका ठिकाणी सुमारे आठ तास छापे टाकले. याशिवाय दौसा येथील राजेंद्र विजय यांचे वडिलोपार्जित घरही सील करण्यात आले आहे. माहितीनुसार, एसीबीला २.२२ लाख रुपये रोख, ३३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ११.८ किलो चांदीचे दागिने, तीन वाहनं आणि १३ प्लॉट सापडले आहेत. याशिवाय तपास पथकाला अधिकाऱ्याशी जोडलेली १६ बँक खातीही आढळून आली.
राजस्थान सरकारने राजेंद्र विजय यांना कोटा विभागीय आयुक्त पदावरून हटवून त्यांना वेटिंगवर ठेवलं आहे. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा त्याला वेटिंगमध्ये ठेवण्यात आलं आहे. राजेंद्र विजय यांनी २५ सप्टेंबर रोजी कोटा विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ते यापूर्वी बारां आणि बालोतराचे जिल्हाधिकारी होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) संचालक डॉ. रविप्रकाश मेहरा यांनी सांगितलं की, ब्युरो मुख्यालयाला राजेंद्र विजय यांची माहिती मिळाली होती. त्यांनी भ्रष्ट मार्गाने जंगम मालमत्ता मिळवल्या आहेत. ज्याचं अंदाजे बाजार मूल्य कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त आहे. या माहितीनंतर वस्तुस्थिती तपासण्यात आली आणि ती बरोबर आढळून आल्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाई केली.