बेरोजगारीला कंटाळून श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला; आयबीने अपहरणाचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:19 AM2022-09-15T07:19:44+5:302022-09-15T11:27:49+5:30
मिर्झा आवेज बेग (वय २१), शेख साकीब शेख अन्वर (२०), उबेद खान शेर खान (२०) अशा तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
बुलडाणा : उद्योजक तथा श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून कोट्यवधी रुपये उकळून झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्याने बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलडाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ताब्यात घेऊन बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलडाणा पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले.
मिर्झा आवेज बेग (वय २१), शेख साकीब शेख अन्वर (२०), उबेद खान शेर खान (२०) अशा तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तिघेही बुलडाण्यातील शेर-ए-अली चौकातील रहिवासी आहेत. हे तिघेही ७ सप्टेंबरला दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी २५०० रुपयांची एक एअर गन विकत घेतली. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करून कोट्यवधी रुपये कमवायचे, अशी त्यांची योजना होती.
दरम्यान, ते आयबीच्या रडावर आले. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती बुलडाणा पोलिसांना देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक व भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांचेभविष्यात अपहरण करण्याचा त्यांचा बेत होता, असे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहितीही काटकर यांनी दिली.
माझा काेणीही शत्रू नाही, हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती मी पण पाेलिसांकडून घेत आहे. त्यानंतर सविस्तर बाेलता येईल. - राधेश्याम चांडक, संस्थापक बुलडाणा अर्बन