लॉकडाऊनमध्ये आयडिया सुचली; ज्यूस विकणाऱ्याने ५००० कोटींचं हवाला नेटवर्क उभं केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 02:16 PM2023-10-06T14:16:55+5:302023-10-06T14:17:55+5:30

या दोघांनी कोरोना काळात सट्टेबाजीसाठी अ‍ॅपची निर्मिती केली. त्याला महादेव अ‍ॅप असं नाव दिले.

Idea came up in lockdown; 5000 crore hawala network created by the juice seller Saurabha chandrakar | लॉकडाऊनमध्ये आयडिया सुचली; ज्यूस विकणाऱ्याने ५००० कोटींचं हवाला नेटवर्क उभं केलं

लॉकडाऊनमध्ये आयडिया सुचली; ज्यूस विकणाऱ्याने ५००० कोटींचं हवाला नेटवर्क उभं केलं

googlenewsNext

नवी दिल्ली – एक असा गेम, ज्यात स्पर्धा तर होते परंतु निकाल आधीच निश्चित केला जातो. हा, पण हरणाऱ्याला याची कल्पना नसते. कारण गेमचा पॅटर्न तसाच आहे. टॅगलाईनही तंतोतंत जुळणारी, जब तक तोंडेंगे नही, तब तक छोडेंगे नही...म्हणजे जोपर्यंत कंगाल होत नाही तोपर्यंत तुम्हाला जाळ्यात अडकवून ठेवणार. हेच महादेव App चं खरे वास्तव.

महादेव अ‍ॅपची चर्चा खूप होतेय, कारण आता याला बॉलिवूडचा तडका लागला आहे. मोठमोठे कलाकार यात अडकले आहेत. रणबीर कपूर, कपिल शर्मा यांच्यासह १५-१६ जण ईडीच्या रडारवर आहेत. यात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ज्यूसचं दुकान चालवणारा काही वर्षात २० हजार कोटींचा मालक बनला. महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून जगातील लोकांना चुना लावण्यमागे २ मास्टरमाईंड आहेत. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल.

या दोघांनी मिळून महादेव अ‍ॅपची निर्मिती केली. महादेव अ‍ॅप घोटाळा जवळपास ५ हजार कोटींचा आहे. सौरभ चंद्राकर याने मित्र रवी उप्पलसोबत मिळून लोकांना फसवण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर UAE इथं काळं साम्राज्य उभारले. छत्तीसगड इथं ज्यूसचं दुकान चालवणारा सट्टेबाजीचा बादशाह बनला. रायपूर इथं सौरभ ज्यूस फॅक्टरी नावाने दुकान चालवायचा. रोडच्या बाजूला ज्यूस विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सौरभला काहीतरी मोठे करायचे होते. पैसे कमावायचे होते. सुरुवातीला त्याने ज्यूस फॅक्टरी नावाने छत्तीसगडच्या अनेक शहरात दुकाने उघडली. तिथूनच त्याला पुढे सट्टा लावण्याची सवय जडली. तो ऑफलाईन सट्टा लावायचा. परंतु कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने ऑनलाईन सट्टा खेळण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये त्याने सट्टेबाजांसाठी अ‍ॅप बनवण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याचा मित्र रवी उप्पल याची एन्ट्री होते.

या दोघांनी कोरोना काळात सट्टेबाजीसाठी अ‍ॅपची निर्मिती केली. त्याला महादेव अ‍ॅप असं नाव दिले. सोशल मीडियात असे प्रमोशन केले की काही दिवसांत ५० लाख लोकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केला. देशात ऑनलाईन गेमिंगचे क्रेझ आहे. लहान मुलांपासून अनेक युवक त्यात जोडले आहेत. छत्तीसगडपासून सुरुवात झालेल्या महादेव अ‍ॅपच्या घोटाळ्याची ईडीने चौकशी करताच अनेक खुलासे समोर आले. त्यामुळे ईडी अधिकारीही हैराण झाले. गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मागील १ वर्षात एकूण ५ हजार कोटींची उलाढाल झाली.

कसा होतो घोटाळा?

महादेव अ‍ॅप ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करते. या गेमची सुरुवात ५०० रुपयांनी होते, जेणेकरून अधिक लोकांना ही सवय लागेल. महादेव अ‍ॅप(Mahadev App) पोकर, कार्ड गेम, चांस गेम, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉलसारख्या विविध खेळांमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी उपलब्ध करून देते. मागील ४ वर्षापासून महादेव अ‍ॅप सुरू आहे. या अ‍ॅपचे हेडकॉटर UAE इथं आहे. तर कॉलसेंटर श्रीलंका, नेपाळमध्येही आहे. भारताशिवाय अ‍ॅपचे नेटवर्क नेपाळ, बांगलादेशसह अन्य देशातही पसरले आहे.

बॉलिवूड कलाकर कसे अडकले?  

फेब्रुवारी २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरचे UAE इथं लग्न होते, या लग्नात महादेव अ‍ॅपचे प्रमोशन करण्यासाठी २०० कोटी रोकड खर्च करण्यात आली. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून युएई इथं नेण्यासाठी खासगी विमान करण्यात आले. लग्नात अनेक नामवंत लोकांना बोलावण्यात आले. ज्यात नेहा कक्कर, टायगर श्रॉफ, भाग्यश्रीसह १५-१६ सेलिब्रिटीज पोहचले होते. ईडीच्या रिपोर्टनुसार, या लग्नात वेडिंग प्लॅनर्स, डान्सर, डेकोरेटर्स मुंबईहून बोलावण्यात आले. त्या सर्वांना रोखीच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आले. रणबीर कपूर याच्यावर महादेव अ‍ॅपचे प्रमोशन करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यासाठी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे.

Web Title: Idea came up in lockdown; 5000 crore hawala network created by the juice seller Saurabha chandrakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.