मोटरमनने वाचविले इडली विक्रेत्याचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:18 PM2019-10-18T15:18:29+5:302019-10-18T15:36:45+5:30
कुमार हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना, तोल जाऊन मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पडला होता.
मुंबई - हार्बर मार्गावरील वाशी-मानखुर्द स्थानकांदरम्यान लोकलमधून तोल जाऊन पडलेल्या चुलबुल कुमार (१९) या इडली विक्रेत्याचे प्राण मोटरमन गुमानी दास आणि गार्ड डी.के. चौरसिया यांनी वाचविले.
१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ आली असताना, मोटरमन दास यांना रेल्वे रुळावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसला. मोटरमन दास यांनी गार्ड यांच्याशी संपर्क साधून लोकल थांबवली. त्यानंतर मोटरमन, गार्ड आणि प्रवाशांनी जखमी त्या व्यक्तीला उचलून लोकलमध्ये बसविले.
घटनेची माहिती मोटरमन चौरसिया यांनी मानखुर्द स्थानकातील कर्मचारी आणि पोलिसांनी कळविली. त्यानुसार मानखुर्द स्थानकात स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती. लोकल मानखुर्द स्थानकात पोहोचताच जखमी इडली विक्रेता चुलबुल कुमार (१९) याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, कुमार हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना, तोल जाऊन मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पडला होता.