सावधान! 'चाइल्ड पोर्नोग्राफी' सर्च केल्यास पोलीस धडकणार तुमच्या दारात; सायबर सेलची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:08 AM2021-08-01T08:08:15+5:302021-08-01T08:08:58+5:30
फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, तसेच मित्राला शेअर केल्याच्या आरोपावरून शहरातील १४ जणांवर सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.
औरंगाबाद : बालकांचा लैंगिक कृत्यासाठी वापर करणे, त्यांची छायाचित्रे, व्हिडिओ क्लीप बनविणे आणि ती प्रसारित करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द टाइप करण्यापासून ते चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, प्रसार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सायबर पोलीस विभाग इंटरनेटवर नजर ठेवून आहेत. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च केले तर पोलीस थेट तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतात.
फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, तसेच मित्राला शेअर केल्याच्या आरोपावरून शहरातील १४ जणांवर सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शेकडो पोर्नोग्राफी वेबसाइट बंद केल्या तरी आजही पोर्नोग्राफीच्या हजारो साइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पोर्नोग्राफी पाहणारांची संख्या कमी नाही. सामाजमाध्यमांवर बालकांच्या पोर्नोग्राफीची क्लीप वा छायाचित्रे अपलोड आणि डाऊनलोड करणे आणि ती प्रसारित करणे हा गुन्हा आहे. सायबर पोलिसांनी औरंगाबाद शहरात गतवर्षी ९ व यावर्षी ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटकही केली आहे.
...अशी आहे तुमच्यावर नजर
पोर्नोग्राफीकरिता बालकांचा उपयोग होऊ नये याकरिता अमेरिकेत व भारतात कडक कायदे आहेत. सोशल मीडियांच्या कंपन्यांचे सर्व्हर अमेरिकेत असल्याने तेथील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्सपोलाइड चिल्ड्रन संस्था काम करते. इंटरनेटवर चाइल्ड पोर्नोग्राफ हा शब्द सर्च करणे, डाऊनलोड करणे, अपलोड करणारांचा शोध घेऊन त्यांची माहिती केंद्र सरकारला पाठविली जाते. केंद्राकडून महाराष्ट्र सायबर सेलला त्या वापरकर्त्यांची माहिती, शिवाय त्याने अपलोड, डाऊनलोड केलेले वा प्रसारित केलेल्या सीडीसह एक टीप पाठविली जाते. नंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतील सायबर पोलिसांना ही माहिती पाठवण्यात येते.