इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा, घातपात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:12 AM2022-09-01T06:12:13+5:302022-09-01T06:12:30+5:30

Crime News: जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Igatpuri burning incident: The charred body in 'that' car is that of a retired army soldier, police are investigating whether it was an accident or accident. | इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा, घातपात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू

इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा, घातपात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेवाडी शिवारात मंगळवारी (दि. ३०) जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आता त्यानुसार पुढील तपासाची चक्रे फिरविली आहेत.

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात एक कार जळाल्याची माहिती मंगळवारी (दि. ३०) प्राप्त होताच त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास केला असता, सदर घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा कयास लावण्यात आला होता. या जळालेल्या कारमध्ये एक अज्ञात व्यक्तीही जळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सदर गाडी व संबंधित मृत कोण याबाबत तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. या जळीतकांडात जळालेली व्यक्ती पुरुष असल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली. संबंधित व्यक्ती चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ (३६) ही असल्याचे निष्पन्न झाले.

दोन महिन्यांपूर्वीच लष्करी सेवा संपवून, संदीप गुंजाळ हे निवृत्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवृत्तीनंतर त्यांनी इगतपुरी तालुक्यातील एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी सुरू केली होती, असेही सांगितले जात आहे. चांदवडवरून ते इगतपुरी येथे ये-जा करत असत. सदर कंपनी व जळीतकांड घडलेले ठिकाण १२ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने, त्याच परिसरात असल्याने गुंजाळ यांचा घातपात झाला असल्याचा कयास पोलीस सूत्रांच्या वतीने वर्तविला जात आहे. सदर घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. या जळीतप्रकरणी विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, तपास अधिकारी संजय कवडे आदी तपास करीत आहेत.

पोलिसांपुढे आव्हान

पर्यटन क्षेत्र असलेल्या या आंबेवाडी परिसरात झालेल्या जळीतकांडातील मयत संदीप गुंजाळ हे एकटे होते की त्यांच्या समवेत आणखी कोण होते. ते ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या कंपनीतील कुणाचा यामध्ये सहभाग आहे काय, झालेला हा अपघात आहे की घातपात आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून पोलिसांसमोर याचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Igatpuri burning incident: The charred body in 'that' car is that of a retired army soldier, police are investigating whether it was an accident or accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.