चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 05:50 PM2022-09-20T17:50:22+5:302022-09-20T17:53:13+5:30

IIT Mumbai crime news: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे.

IIT Mumbai after Chandigarh MMS Leak! The canteen employee was secretly recording the video of the ladies student in the bathroom | चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी

चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी

googlenewsNext

चंदीगढच्या खासगी विद्यापीठातील ६० हून अधिक विद्यार्थिनींच्या अंघोळ करतानाच्या एमएमएस कांडने देशभरात खळबळ उडविलेली असताना आता मुंबईतील प्रसिद्ध आयआयटी मुंबई कॉलेजमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून अश्लिल व्हिडीओ काढण्याचे हे प्रकरण  आहे. 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने रविवारी रात्री लेडीज हॉस्टेलच्या 10 (H10) बाथरुमच्या खिडकीतून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पवई पोलिसांनी एफआयआर दाखल करून या २२ वर्षांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अद्याप तसा कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. 

बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
आयआयटी मुंबईचे डीन प्रो. तपनेंदु कुंडू यांनी सांगितले की, हॉस्टेलचे कॅन्टीन पुरुष कर्मचारीच चालवित होते. बाहेरच्या भागातून बाथरुमपर्यंत पोहोचण्याची वाट सील करण्यात आली आहे. यानंतर विंग एच १० ची पाहणी करून गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची सोय करण्यात आली आहे. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅन्टीनचा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कॅन्टीन तात्काळ बंद करण्यात आले असून, महिला कर्मचारी असतील तरच ते सुरू करण्यात येणार आहे.

मोहालीत काय घडलेले
पंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रविवारी रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शनं केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. 
 

Web Title: IIT Mumbai after Chandigarh MMS Leak! The canteen employee was secretly recording the video of the ladies student in the bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.