अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:58 AM2024-08-24T05:58:31+5:302024-08-24T06:01:11+5:30

पोलिसांनी केलेल्या कारवाई ३५ जणांना अटक करण्यात आली असून ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Illegal call center busted in Alibaug, 35 arrested in police action, cheating US citizens  | अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

अलिबाग : व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो ही अमेरिकेत बंदी असलेली औषधे घरपोच देण्याचे आमिष दाखवत थेट अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अलिबाग पोलिसांनी केला आहे. त्यासाठी येथील एका रिसॉर्टमध्ये बेकायदा कॉल सेंटरची निर्मिती करण्यात आली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाई ३५ जणांना अटक करण्यात आली असून ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. अटक केलेले आरोपी हे परराज्यातील असून, २५ ते ३० वयोगटातील आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. परहूर येथील नेचर एज अलिबाग या रिसॉर्टमध्ये काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. 

आवास येथेही होते सेंटर
परहूरसोबतच आवास येथेही ऑनलाइन कॉल सेंटर सुरू होते. परहूर येथे कारवाई झाल्याचे कळताच आवास येथील आरोपी फरार झाले आहेत. मात्र, येथील फैज आरिफ शेख, महमंद अझहर अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलिस पुढील तपास करत आहेत. 

-अलीकडेच सुरू झालेल्या या रिसॉर्टमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.
- त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी सापळा रचत रिसॉर्टवर कारवाई केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


अशी होत होती फसवणूक 
इंटरनेटच्या साहाय्याने अमेरिकी नागरिकांशी संपर्क साधून यू. एस. फार्मा या कंपनीच्या नावाने प्रतिनिधी जॉन बोलत असल्याचे सांगून अमेरिकेत बंदी असलेल्या व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो या गोळ्या घरपोच देण्याचे आमिष दाखवले जात होते. 
यासाठी ग्राहकाला पेमेंटसाठी गिफ्ट कार्डचा वापर करायला सांगून कोणाच्या तरी साहाय्याने रिडीम करून ते पेमेंट हवालाद्वारे मुख्य आरोपी रोहित बुटाने याच्याकडे जमा होत होते. मात्र, ग्राहकाला औषध दिले जात नव्हते. 
बुटाने फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३१ संगणक, लॅपटॉप, हेडफोन, ५ चारचाकी, १ दुचाकी, वायफाय युनिट मोडेम व इतर लाकडी फर्निचर, ५५ मोबाइल असा ८५ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांच्या सूचनांनुसार पोलिस निरीक्षक किशोर साळे, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक युवराज मराठे, सहायक फौजदार प्रशांत पिंपळे,  संतोष पाटील, पोलिस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, सचिन शेलार, सदानंद झिराडकर, अमर जोशी, हर्षल पाटील, मनीष ठाकूर यांच्यासह परेश म्हात्रे, पोशि. गणेश पारधी, पोशि. संकेत पाटील,  मयूरी जाधव, कीर्ती म्हात्रे यांनी ही यशस्वी कारवाई केली.   

Web Title: Illegal call center busted in Alibaug, 35 arrested in police action, cheating US citizens 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.