बेकायदा घरवाटप; म्हाडाची महिला अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:53 AM2018-09-07T01:53:35+5:302018-09-07T01:53:43+5:30
‘मास्टर लिस्ट’साठी बोगस कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी म्हाडाच्या उप समाज विकास अधिकारी (सीओडी) संध्या लांडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई : ‘मास्टर लिस्ट’साठी बोगस कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी म्हाडाच्या उप समाज विकास अधिकारी (सीओडी) संध्या लांडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
वर्षा लांडगे यांनी २००९ साली अपात्र व्यक्तीच्या बोगस कागदपत्रावर स्वाक्षरी करून ११ अपात्रांना दादर, करी रोडमध्ये घरे दिली. २०१३पासून पोलीस या प्रकरणी तपास करीत होते. लांडगे यांना २०१५, २०१७मध्ये समन्सही जारी झाले होते. सदनिकांचे वाटप केलेल्यांकडून बोगस कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले. वरिष्ठांच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचे लांडगे यांनी २०१३मध्ये पोलीस जबाबात म्हटले होते. त्यामुळे म्हाडाच्या काही वरिष्ठांचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे. तर, कार्यालयातील कारकुनाने कागदपत्रे बदलली असावीत, असा दावा लांडगे यांचे वकील व्ही. डी. मुणगेकर यांनी केला.