लातूरमध्ये अवैध दारू पकडली; पाच जणांना अटक, ताडी, रसायन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:24 PM2022-12-28T20:24:46+5:302022-12-28T20:25:29+5:30
देशी दारू, रसायन, ताडीसह दुचाकी असा १ लाख १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजकुमार जोंधळे
लातूर : जिल्ह्यात चार ठिकाणी बुधवारी छापा मारून अवैध दारुसाठा जप्त केला आहे. देशी दारू, रसायन, ताडीसह दुचाकी असा १ लाख १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत एकूण आठ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई 'उत्पादन शुल्क'च्या पथकाने केली.
लातूर जिल्ह्यातील जेवळ (ता. औसा), पळशी, वसंतनगर तांडा (ता. रेणापूर), लांबाेटा माेड (ता. निलंगा) परिसरात अवैध दारू विक्रीबराेबरच चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा मारला. यावेळी एका दुचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करताना पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. यात २६ लिटर देशी दारू, दारू निर्मिती करण्यासाठी लागणारे १२०० लिटर रसायन, ४५ लिटर ताडी आणि एक दुचाकी असा एकूण १ हजार १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत एकूण आठ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांच्या पथकाने मारला छापा...
ही कारवाई अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील निरीक्षक आर. एम. बांगर, उदगीर येथील निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, हणमंत मुंडे, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस यांच्या पथकाने केली.