दारू तस्करीची टिप मिळाली, पण पोलिसांना कारमध्ये काहीच सापडेना; तितक्यात 'तो' आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:34 PM2021-09-07T14:34:21+5:302021-09-07T14:41:08+5:30
दारू तस्करी प्रकरणी तिघांना अटक; दोन आलिशान कार जप्त
सूरत: गुजरातमध्ये दारूवर बंदी आहे. मात्र अवैध दारू विक्री अगदी जोरात सुरू आहे. दारू माफिया इतर राज्यांमधून दारू आणून गुजरातमध्ये सर्रास दारू विक्री करतात. सूरतच्या क्राईम ब्रांचनं अशाच तस्करीचा पर्दाफाश केला आहे. तस्करीसाठी वापरण्यात येत असलेली शक्कल पाहून पोलीस चक्रावून गेले. दोन आलिशान गाड्यांमध्ये लपवण्यात आलेला दारूचा साठा शोधण्यासाठी पोलिसांना मॅकेनिकची मदत घ्यावी लागली.
सूरत क्राईम ब्रांचनं तीन दारू तस्करांना अटक केली. विकास उपाध्याय, हाबिद सय्यद आणि फाल्गुन प्रजापती अशी तिघांची नावं आहेत. तीन जण गोव्याहून इनोव्हा आणि एक्सयूव्ही कारमधून दारूच्या मोठ्या साठ्याची तस्करी करत असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. तस्करांना पकडण्यासाठी क्राईम ब्रांचच्या विविध पथकांनी फिल्डींग लावली. तिघेजण दोन कारसह सूरतमध्ये येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
क्राईम ब्रांचनं दोन्ही कारची तपासणी केली. कारच्या वर, खाली, आत सगळीकडे तपासणी करूनही दारूचा साठा सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिघांची चौकशी सुरू केली. मात्र एकही जण तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी कार मॅकेनिकला बोलावलं. मॅकेनिकनं कारच्या सीटखाली, पुढे असलेल्या लाईटच्या जवळ तयार करण्यात आलेली गुप्त जागा शोधून काढली. तिथे तब्बल दारूच्या तीन हजार बाटल्या लपवण्यात आल्या होत्या.
दोन्ही आलिशान कारमधून जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत जवळपास ५ लाख रुपये आहे. पोलिसांनी एक्सयूव्ही आणि इनोव्हा कारसह २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तस्करांनी दारू लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून पोलीस चक्रावले. तस्कर असं काही करतील याची कल्पनाही आम्ही केली नव्हती, असं सूरत क्राईम ब्रांचचे एसपी आर. आर. सरवय्या यांनी सांगितलं.