शेतीसाठी दिलेल्या जमिनीची बेकायदा विक्री, कोट्यवधींचा गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:12 AM2021-01-31T01:12:42+5:302021-01-31T01:12:50+5:30
Crime News : तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे.
बोईसर - तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे. या व्यवहारात सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तारापूर परिसर विकास समितीचे अध्यक्ष जितेंद्र राऊळ यांनी पत्रकार परिषदेत करून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणू संशोधन केंद्र या देशाच्या अत्यंत संवेदनशील अशा दोन्ही प्रकल्पांच्या प्रतिबंधित क्षेत्रापासून अवघ्या अडीच कि.मी. अंतरावर असलेल्या सर्व्हे नं. १२८/१/१ अ च्या जमिनीस गट नं. ६४ पैकी सुमारे ७२ एकर २५ गुंठे क्षेत्र असलेली शासकीय जमीन कांबोडे मच्छीमार सामुदायिक सोसायटीला १९७३ व १९७८ साली अशा दोन टप्प्यांत नवीन अविभाज्य शर्तीने केवळ शेती प्रयोजनासाठी अटी व शर्तीवर देण्यात आली होती. मात्र, या सोसायटीने या शासकीय जमिनीपैकी काही जमीन एका इसमास भाडेपट्टीवर, तर ४८ एकर जमीन शासनाच्या परवानगीशिवाय परस्पर लिलाव केल्यानंतर स्थानिकांनी महसूल खात्याकडे करवाईची मागणी केली. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक केल्याचा आरोप राऊळ यांनी केला आहे.