Crime News: आय अॅम सॉरी मॉम, डॅड! रोड रोमिओला कंटाळून वाढदिनीच तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:33 AM2021-09-05T10:33:17+5:302021-09-05T10:34:45+5:30
Delhi Crime News: दिल्लीच्या सेंट्रल जिल्ह्यातील आनंद पर्वत पोलिसांनी आत्महत्येसाठी उकसविल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली: वाढदिवसादिनीच 19 वर्षांच्या तरुणीने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका रोडरोमिओच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याने पालकांना धक्का बसला आहे. हा आरोपी तरुण तिच्या शेजारीच राहत होता. तो जाता-येता तिची वाट अडवत होता, असा आरोप मृत तरुणी प्रीतिच्या वडिलांनी केला आहे. (19 years old girl commite suicide in Delhi on her birthday.)
दिल्लीच्या सेंट्रल जिल्ह्यातील आनंद पर्वत पोलिसांनी आत्महत्येसाठी उकसविल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तरुणीने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर पेनाने 'आय अॅम सॉरी मॉम-डॅड, मोहितने मला असे करण्यास भाग पाडले'; असे लिहिले होते. तिचे वडील हे बॅटरी रिक्षा चालवितात. त्यांना एक मुलगा आहे, जो 11 वी मध्ये शिकतो. शुक्रवारी प्रीतीचा वाढदिवस होता. पती-पत्नी कामावर निघून गेले. सायंकाळी त्यांच्या मुलाचा फोन आला, ताईने पंख्याला गळफास लावून घेतला आहे. हे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
पोलिसांनी मृतदेह उतरवून आरएमएल हॉस्पिटलला पाठविला. तिच्या वडिलांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी तिला मोहितसोबत बोलताना पाहिले होते. यामुळे मोहितच्या घरी तक्रार करून दोघांनाही यापुढे न बोलण्यास बजावले होते. मात्र, मोहितने यास नकार दिला होता. प्रीती गल्लीतून जात येत असताना तिचा रस्ता अडवत होता आणि तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. मैत्रीसाठी दबाव टाकत होता. या त्रासाल कंटाळून प्रीतीने आत्महत्येचे पाऊल उचलले.
मोहित छेड काढत असल्याची तक्रार त्याच्या आईकडे अनेकदा करण्यात आली होती. मात्र, तो ऐकतच नव्हता. तो तिला फोन नंबर बदलून बदलून फोन करत होता तसेच बदनाम करण्याची धमकी देत होता. तीन-चार दिवसांपूर्वी प्रीतीने मोहितला समजवा नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, मुलीची आणि आरोपीचे कॉल डिटेल्स मागविण्यात आले आहेत. पुरेसे पुरावे मिळाल्यावर त्याला अटक केली जाईल.