पैशाची बॅग समजून चोरट्याने नेमबाजीचे किट केले लंपास; आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 11:05 PM2019-03-18T23:05:45+5:302019-03-18T23:06:23+5:30
नेमबाजीच्या सरावासाठी असलेली ३८०० जिवंत काडतुसे अखेर पोलिसांच्या हाती लागल्याने नेमबाज मला किट परत मिळाले अशी माहिती विश्वजित शिंदे यांनी दिली.
मुंबई - भारताचे माजी राष्ट्रीय नेमबाज विश्वजीत शिंदे यांच्यासोबत वांद्रे रेल्वे स्थानकात गेल्या शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील स्पर्धा संपवून निजामुद्दीनवरून मुंबईकडे संपर्क क्रांती या रेल्वेगाडीने प्रवास करीत असताना त्यांची शूटिंग किट व ३८०० जिवंत काडतुसं असणारी बॅग चोरीला गेली असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विश्वजीत शिंदे यांनी तात्काळ वांद्रे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने वडाळा येथील म्हाडा कॉलनी परिसरातून ललित मनोजकुमार धिंगान याला अटक केली.
वांद्रे लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी देखील या प्रकरणाची तातडीने चौकीशी करत वांद्रे रेल्वे स्थानकावरील आणि वडाळा अग्निशमन दलाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना ललित मनोजकुमार धिंगान आणि त्याची पत्नी ज्योती हे शिंदे यांची बॅग घेऊन पळताना आढळले. या जोडप्याने वांद्रे रेल्वे स्थानकावरून एका कॅबद्वारे पळ काढल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या कॅब ड्रायव्हरचा पोलिसांनी माग काढला. कॅब चालकाने योग्य माहिती दिल्याने चोर जोडप्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. नेमबाजीच्या सरावासाठी असलेली ३८०० जिवंत काडतुसे अखेर पोलिसांच्या हाती लागल्याने नेमबाज मला किट परत मिळाले अशी माहिती विश्वजित शिंदे यांनी दिली.