गुन्हेगारी जगतात 2018मध्ये या घडल्या महत्त्वाच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 03:47 PM2018-12-31T15:47:02+5:302018-12-31T15:48:58+5:30
सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या मुंबई पोलीस दलासाठी 2018 हे वर्ष कसं होतं याचा आढावा घेऊया. 2018 साली कोणत्या बहुचर्चित घटना घडल्या त्यावर नजर टाकूयात
2018 वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्व मज्जा लुटायला तयार आहोत. मात्र, आपल्या आनंदात विरजण पडू नये म्हणून मुंबई पोलीस आज सज्ज आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी पाहता दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी कंबर कसली आहे. अशा या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या मुंबई पोलीस दलासाठी 2018 हे वर्ष कसं होतं याचा आढावा घेऊया. 2018 साली कोणत्या बहुचर्चित घटना घडल्या त्यावर नजर टाकूयात....
*मैत्रीला काळिमा फासणारी घटना; कीर्तीचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही; मात्र आरोपी गजाआड
मैत्री हे जगातले असे नाते आहे जे माणूस स्वतः निवडतो. मात्र मैत्रीला काळीमा फासणाऱ्या घटनाही अनेकदा उजेडात येतात. मुंबईतील वडाळा भागात घडलेले किर्ती व्यास हत्या प्रकरण असेच आहे. किर्ती व्यासची हत्या तिची मैत्रीण खुशी सजवानी आणि मित्र सिद्धांत ताम्हणकर या दोघांनीच केली. खुशी सजवानीचे बीब्लन्ट नावाचे सलून आहे. या प्रकरणी किर्ती व्यासचा मृतदेह अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र या प्रकरणातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे खुशीने किर्तीचा खून करूनही ती हरवल्याच्या फेसबुक पोस्ट लिहिल्या होत्या. पोस्टमधून तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर ती आणि तिच्या मित्राला पोलिसांनी गजाआड केले.
*अथर्वची हत्या की अपमृत्यू हा पेच कायम
बहुचर्चित अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनही चाचपडत सुरु आहे. अथर्वच्या मृत्यूच्या आठ महिन्यानंतरही पोलिसांना ठोस पुरावा शोधून काढता आलेला नाही. अथर्वचे वडील पोलीस दलातच असून ते आर्थिक गुन्हे शाखेमध्ये अधिकारी आहेत. पोलीस हत्येच्या अंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण अथर्वची हत्या कशी झाली त्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. त्यामुळे या प्रकरणात अपघाती मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलीस काढू शकतात. आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्वचा मृतदेह सापडला होता. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीस आता फॉरेन्सि्क तज्ञाच्या एका अहवालाची वाट पाहत आहेत. त्यानंतर मृत्यू कसा झाला त्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचू शकतात. ९ मे रोजी आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्वचा मृतदेह सापडला होता.
*हिरे व्यापारी उदानी हत्याकांड : सात जणांना अटक
घाटकोपरमध्ये राहणारे उदानी २८ नोव्हेंबरला गायब झाले. त्यांची कार पूर्व द्रुतगती महामार्गावर सापडली, पण उदानी यांचा काहीच सुगावा लागला नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उदानी दुसऱ्या कारने नवी मुंबईकडे गेल्याचं स्पष्ट झाले होते. दरम्यान, ३ डिसेंबरला पनवेलजवळ खाडीतील झुडपात एक मृतदेह सापडला. या मृतदेहावरील कपड्यांवरून तो मृतदेह उदानींचाच असल्याचं ७ डिसेंबरला स्पष्ट झाले. या हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात आली आहे. महेश प्रभाकर भोईर, निखत ऊर्फ झारा मोहम्मद, सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली, सचिन पवार, दिनेश पवार, प्रणित भोईर आणि सिद्धेश पाटील अशी या सात आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात झाराला, तुला एखादा चांगला रोल मिळवून देतो असे सचिन पवार आणि दिनेश पवार यांनी सांगून उदानीला तिची ओळख एक मॉडेल आहे, अशी करून दिली होती. ज्या वेळेला उदानीची हत्या करण्यात आली त्यावेळी ती तेथे उपस्थित होती, अशी माहिती पुढे आली आहे.
सर्वात मोठी घटना : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण
८ ऑगस्ट रोजी नालासापाऱ्यातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसच्या हाती काही शस्त्रास्त्र देखील लागली होती. यावेळी पोलिसांनी गावठी बॉम्ब, काडतुसं, बॉम्ब बनविण्याचे साहित्य देखील जप्त केलं होतं. तसेच वैभव राऊतला अटक केल्यानंतर सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर देखील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान, या चौघांसह ATSनं आणखी १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. चौकशीअंती अनेक धक्कादायक खुलासे यावेळी चौकशी दरम्यान करण्यात आले आहेत.
#MeToo मोहिमेंतर्गत खळबळजनक घटना
7 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अखेर पोलिसांकडे लेखी तक्रार केली. नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील तक्रारीत उल्लेख आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तनुश्रीने ही तक्रार दाखल केली. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती.
व्यावसायिक हर्षद ठक्कर बेपत्ता; अद्याप शोध सुरूच
आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने २ ऑक्टोबरपासून हर्षद ठक्कर घरी गेलेच नाहीत. आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेड ही कंपनी देशभरात अंतर्वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे. दादर पोलीस हर्षद ठक्कर यांचा शोध घेत आहे. ठक्कर कुटुंबीय, नातेवाईक, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांकडे चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्ह येथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे समजते. ठक्कर कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आले होते.२ ऑक्टोबरला हर्षद शेवटचे दादर येथील पॅसिफिक प्लाझा या इमारतीतील कार्यालयात दिसले. त्यावेळी निघण्यापूर्वी त्यांनी मोबाईल, पाकिट आणि पासपोर्ट कार्यालयात ठेवून दिले. यासोबत त्यांनी एक गुजराती भाषेत चिठ्ठी देखील ठेवली होती.
मोठी कारवाई! 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; ४ जणांना अटक
वाकोला परिसरातून ड्रग्जचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. वाकोल्यामध्ये एका ठिकाणी उभ्या असलेल्या कारमधून 100 किलो फेंटानिल ड्रग्ज आझाद मैदान अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. या 100 किलो फेंटानिल ड्रग्जची किंमत अंदाजे १ हजार कोटींच्या घरात आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. थर्डी फर्स्टच्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.