तलाहच्या लॅपटॉपमधून उलगडणार महत्वाचे धागेदोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:00 PM2019-01-28T15:00:32+5:302019-01-28T15:14:30+5:30
ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केला आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे - दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ऐन प्रजासत्ताक दिनादिवशी मुंब्रा येथे जाऊन उमत मोहम्मदीया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक असे या 24 वर्षीय तरुणास अटक केली. एटीएसने त्याला संभाजीनगर येथे आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केला आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान, मोहसीन आणि तकी हे तिघे भाऊ असून आयसिसने प्रेरित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते. मोहसीन हा सर्वात मोठा भाऊ असून तो मुंब्र्यातील सर्व सदस्यांवर देखरेख ठेवत होता. मोहसीन हा २६ जानेवारीला अटक केलेल्या तलाहच्या संपर्कात होता असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तलाह हा विक्रोळी येथे यापूर्वी राहत होता. मात्र, सात - आठ महिन्यांपूर्वी तलाहने मुंब्रा येथे राहण्यास गेला होता. एटीएसने केलेल्या कारवाईत मोहसीनसह त्याचा भाऊ सलमान खान आणि धाकटा मोहम्मद तकी उर्फ अबु खालीद सिराजुद्दिन खान (२०) हा फुटबॉलपटू आहे. तो मुंब्रासह कुर्ला येथे एका क्लबमध्ये प्रशिक्षक होता. अटक केलेला गट प्रशिक्षणाच्या निमित्ताने येथे एकमेकांना भेटून चर्चा करत असे. यामध्ये क्लबमधील अन्य काही तरुणांचे माथी भडकविण्याचा प्रयत्न झाला आहे का? या दिशेनेही एटीएस तपास करत आहेत. मुंबईसह मुंब्रा, औरंगाबादमधील संशयितांकडे एटीएस कसून चौकशी करत आहेत. काहींना चौकशीसाठी एटीएसने ताब्यात घेतल्याचे समजते.
दहशतवादविरोधी पथकास ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर शहरातील गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याच कट उमत मोहम्मदीया ग्रुपने रचला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उमत मोहम्मदीया ग्रुपवर लक्ष ठेवून औरंगाबाद येथील संभाजीनगरातील चार आणि मुंब्य्रातील पाच अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती. हे नऊ जण सध्या ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. यानंतर तलाह याला २६ जानेवारी रोजी अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल यांच्या तक्रारीवरून या दहाही जणांविरोधात भा.दं.वि. 120 ब, 18, 20, 38, 39 बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967 सुधारणा 2004, 2008 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1967 सुधारित 2008 नुसार मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्य्रातील दोस्ती प्लॅनेट एमरॉल्ड टॉवरमध्ये आजोबांच्या घरी (आईच्या वडिलांकडेच) तलाह दहशतवादी कट रचत होता. त्याच्यासोबत आजोबा, आई राहत असे तर वडील नोकरीच्या निमित्ताने दुबईत वास्तव्याला आहेत अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्याने दिली.