श्रद्धाचे शिर मिळणे अशक्य; पाणी उपसून अख्खा तलाव केला होता रिकामा, जंगलात सापडला जबडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 07:07 AM2022-11-26T07:07:00+5:302022-11-26T07:07:50+5:30
आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई : हत्येनंतर श्रद्धाचे शिर तलावात टाकल्याचे आधी आफताबने म्हटले होते. त्यामुळे पाणी उपसून अख्खा तलाव रिकामा करण्यात आला, पण त्यात शिर मिळाले नाही. नंतर जंगलात तिच्या जबड्याचा भाग सापडला. त्यातही दातांचा भाग आहे.
त्यामुळे आता शिर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जंगलातील काही प्राण्यांनी शिर खाल्ले असावे, असा त्यांचा संशय आहे. रक्ताच्या वासाने प्राण्यांनी तिच्या मृतदेहाचे तुकडे खाऊन नष्ट करावेत म्हणूनच तो ते जंगलात टाकत होता, असे तपास अधिकाऱ्यांना वाटते.
‘कबुली दिलेली नाही’ -
श्रद्धाची हत्या केल्याचा गुन्हा आफताबने कबूल केलेला नाही, असे म्हणणे त्याच्या वकिलांनी मांडले. त्याचे वकील अविनाश कुमार म्हणाले, मी आफताबला भेटलो, तेव्हा मला तो आक्रमक वाटला नाही. शांत होता. त्याने अद्याप खून केल्याची कबुली दिलेली नाही.
वकिलांना हल्ल्याची भीती -
हत्याकांडामुळे संतप्त झालेल्या काही संघटना आफताबवर हल्ला करतील, असा संशय त्याच्या वकिलांनी व्यक्त केला आहे. त्यात धार्मिक संघटनांचा समावेश असू शकतो, असे म्हणणे त्यांनी मांडले.
पाच चाकू जप्त -
आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यासाठी पाचही चाकू फाॅरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
थंड डोक्याने प्लॅनिंग -
आफताबने श्रद्धाच्या हत्येचे शांतपणे प्लॅनिंग करूनच तिचा खून केल्याचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनी आतापर्यंतच्या शोधकार्यातून काढला आहे. त्यांच्यात नेमके कशावरून खटके उडत होते आणि तो खूप आधीपासून तिच्या हत्येचा विचार करत होता. त्यामुळेच त्याने हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, कुठे लावयाची, पुरावे कसे नष्ट करायचे हेही ठरविल्याचे आतापर्यंतच्या तपासातून दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.