देशी दारू विक्रीच्या तीन अड्ड्यांवर छापे;अवैधरीत्या दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:50 AM2018-08-02T04:50:36+5:302018-08-02T04:50:47+5:30
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी दोघे जण पावणे गावचे राहणारे असून एक जण मुंबईचा राहणारा आहे.
देशी दारू विक्रीप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विदेशी सुखू सरोज, फिरोज खान व प्रभाकर देवबा भालेराव अशी त्यांची नावे आहेत, त्यापैकी खान हा विक्रोळीचा राहणारा असून उर्वरित दोघेही पावणे गावचे राहणारे आहेत. पावणे गाव परिसरात व नेरुळ एमआयडीसी परिसरात अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.
मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून परिसरात देशी दारूची विक्री सुरू होती. यासंदर्भात अनेकांनी पोलिसांकडे तक्रारही केलेली आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पोलीस ठाणे हद्दीच्या परिसरात गस्तीदरम्यान संशयितांची सखोल चौकशी केली असता, तीन ठिकाणांची माहिती पोलिसांसमोर आली. यानुसार ३० जुलै रोजी वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकून देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर कारवाई केली.
अटक केलेल्या तिघांकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांनी ही दारू कोणाकडून घेतली, याचाही अधिक तपास पोलीस करत आहेत. तर अटक केलेल्या तिघांवरही दारूबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.