जागेच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीला कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: September 26, 2024 11:37 PM2024-09-26T23:37:20+5:302024-09-26T23:37:34+5:30
ठाणे न्यायालयाचा आदेश : १४ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येला मिळाला न्याय
ठाणे : जागेच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये मलिक सिकंदर सुरमे यांचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी शाहीद गुलाम मुस्तफा सुरमे (४५) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांनी दोषी ठरवून त्याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सुमारे १४ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येला न्याय मिळाल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी गुरुवारी दिली. ही घटना दि. ३ डिसेंबर २०१० रोजी मुंब्रा भागात घडली होती. मुंब्रा-कौसा जामा मशिदीचे ट्रस्टी अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे आणि मलिक सिकंदर सुरमे, लियाकत ढोले यांच्या ट्रस्टीच्या जागेच्या वादातून अब्दुल गणी डोंगरे आणि शाहिद सुरमे यांनी कट रचून सुरमे तसेच ढोले यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप होता.
या घटनेमध्ये मलिक सुरमे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ आणि १२० ब सह आर्म ॲक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा प्राथमिक तपास मुंब्रा पोलिस आणि त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने करून पुरावे गोळा केले. तसेच याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश वसुधा भोसले यांच्या न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी झाली.
सुनावणीदरम्यान सरकारी वकील वर्षा चंदने यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी शाहीद याला न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला आजीवन सश्रम कारावास आणि १३ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सादिक यांनी केला. मुंब्रा पोलिस ठाण्याचे हवालदार विद्यासागर कोळी यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले.