लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीला शरीर विक्रयास लावणाऱ्या दोघांना कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: March 1, 2024 11:46 PM2024-03-01T23:46:48+5:302024-03-01T23:47:04+5:30
सात वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निकाल
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बांग्लादेशातून लग्नाच्या अमिषाने आणलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकविणाऱ्या लियान उर्फ सौरभ नूर इस्लाम मुल्ला (वय २०) आणि सोहाग मोहम्मद हबीब इस्लाम उर्फ मोहमद सोराफ फकीर (२३ ) या दोघांना ठाणे न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास तसेच एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास शंभर दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षाही ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी ठोठावली.
लियान याने त्याची आत्या यास्मीन उर्फ नितू घाेष यांनी पीडितेला ६ डिसेंबर २०१७ रोजी बांग्लादेशातून ठाण्यातील कळवा भागात आणले होते. तिची लग्नाच्या अमिषाने सेक्स रॅकेटमध्ये ७५ हजारांना विक्री केली होती. हा प्रकार होत असतांनाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी लियान आणि शोहाग या दोन्ही बांग्लादेशी घुसखोर आरोपींना अटक केली.
त्यांच्याविरुद्ध बलात्कारासह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह परकीय नागरिकांचा कायदा, अपहरण आदी कलमांखाली कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे न्यायालयात विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी यातील आठ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उदय देसाई आणि हवालदार एम.बी. पाटणकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.