अबब! २ वर्षात युट्यूबरनं केली तगडी कमाई; आयकर विभागाच्या धाडीत सापडले कोट्यवधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:57 AM2023-07-18T09:57:12+5:302023-07-18T10:08:06+5:30
या पैशातून मुलाने त्याचा व्यवसाय पुढे नेला त्यातून शेजाऱ्यांना ते बघवत नव्हते आणि त्यांनी तक्रार केली असा आरोप तस्लीमच्या वडिलांनी केला.
बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली इथं इन्कम टॅक्स विभागाने एका यूट्युबरच्या घरी धाड टाकली आहे. या कारवाईत यूट्यूबरजवळ २४ लाखांची रोकड जप्त झाली. यूट्युबर तस्लीम खान याने चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा आरोप झाला आहे. तस्लीम खानविरोधात आलेल्या तक्रारीनंतर आयकर विभागाने ही कारवाई करत तस्लीमच्या घरी तपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, यूट्युबर तस्लीम खानने २ वर्षापूर्वी त्याचा एक यूट्यूब चॅनेल सुरू केला होता. या प्रकरणात तस्लीमचा भाऊ फिरोजने एका षडयंत्राद्वारे भावाला अडकवले जात असल्याचा दावा केला. भावावरील सर्व आरोप फिरोजने फेटाळून लावले. तस्लीम बरेलीच्या नवाबगंज भागात राहणार आहे. तस्लीमच्या यूट्युब चॅनेलचे नाव ट्रेडिंग हब ३.० असं आहे. या चॅनेलवर शेअर मार्केटशी निगडित व्हिडिओ तो अपलोड करत असतो. या चॅनेलने आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली आहे. फिरोज हा युट्यूब चॅनेलचा मॅनेजर आहे.
फिरोजने सांगितले की, १ कोटी २० लाख रुपयांमध्ये ४० लाख आम्ही आयकर भरला आहे. मी आणि माझ्या भावाने कुठलेही चुकीचे काम केले नाही. आम्ही युट्यूब चॅनेल चालवतो. त्यातून आम्हाला चांगली कमाई होते हेच सत्य आहे. तर मुलावर लावलेले आरोप चुकीचे आहेत असं तस्लीमचे वडील मौसम खान यांनी म्हटलं. १६ जुलैला आयकर विभागाची टीम तस्लीमच्या घरी पोहचली. तपासात माझा मुलगा निर्दोष आढळला. त्याचसोबत कंपनीचे सर्व कागदपत्रे बरोबर होती. मुलाचा युट्यूब चॅनेल अनेक दिवसांपासून सुरू आहे. चॅनेलच्या माध्यमातून खूप कमाई केली. या पैशातून मुलाने त्याचा व्यवसाय पुढे नेला त्यातून शेजाऱ्यांना ते बघवत नव्हते आणि त्यांनी तक्रार केली असा आरोप तस्लीमच्या वडिलांनी केला.
दरम्यान, ही धाड हे जाणुनबुडून केलेले एक षडयंत्र आहे. मुलाला चुकीच्या आरोपाखाली अडकवले जात आहे असा आरोप आईने केला. सध्या आयकर विभागाकडून तस्लीमची प्रॉपर्टी आणि चॅनेलची पडताळणी सुरू आहे. सर्व कागदपत्रे तपासून घेत तस्लीमची चौकशी सुरू आहे. आयकर विभागाने तस्लीमच्या घरी सापडलेले २४ लाख रुपये रोकड जप्त केले आहेत.