नवऱ्याला वठणीवर आणतो, 'ती' पावडर भाजीत टाकून खायला दे; भोंदूने घातला बाईला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:49 PM2022-12-12T15:49:36+5:302022-12-12T15:49:52+5:30

जळकेवाडीतील प्रकार : उकळले पंधरा हजार, गुन्हा दाखल

In Ahmednagar Karjat cheated the woman by fraud man | नवऱ्याला वठणीवर आणतो, 'ती' पावडर भाजीत टाकून खायला दे; भोंदूने घातला बाईला गंडा

नवऱ्याला वठणीवर आणतो, 'ती' पावडर भाजीत टाकून खायला दे; भोंदूने घातला बाईला गंडा

googlenewsNext

कर्जत : नवरा काहीच कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचा नाद आहे. त्याला यातून सोडवा, अशी व्यथा मांडणाऱ्या महिलेला आपण सगळं ठीक करू, असे सांगत भोंदूबाबाने पांढरी पावडर दिली. ती पावडर पंधरा दिवस भाजीत टाकून नवऱ्याला खायला दे. यासह ताईत गळ्यात बांध, असे सांगितले. यासाठी पंधरा हजार रुपये घेतले. पंधरा दिवसांनंतरही नवऱ्याच्या सवयीत कसलाच फरक न पडल्याने शेवटी त्या महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भोंदूबाबाविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

नवनाथ साहेबराव मांडगे (रा. जळकेवाडी, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. कर्जत तालुक्यातील महिलेची मुलगी पतीसह पुणे येथे राहते. तिचा पती काही कामधंदा करत नसल्याने व त्रास देत असल्याचे फिर्यादीने शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले. शेजारील महिलेने ओळखीच्या जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या भोंदूबाबाला तिच्या घरी बोलावले. त्यानंतर महिलेस व तिच्या मुलीला समोर बसवून त्यांच्या समोरच पाट मांडून त्यावर गहू ठेवून, अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक एक दाणा बाजूला काढून व गव्हाचे दाणे मोजून 'बाई तुझे सर्व खरे आहे. तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचे नाद आहेत असे म्हणून त्याने पांढरी पावडरची पुडी दिली.

ही पुडी पंधरा दिवस नवऱ्याला भाजीतून खाऊ घाल, तुझा नवरा व्यवस्थित होऊन तू म्हणशील तसे तुझे ऐकेल, असे सांगितले. त्यानंतर पुडीसह तीन ताईत घरातील सर्वांना बांधण्यास दिले. त्यांच्याकडून १५ हजार उकळले. तद्नंतर एक हजार रुपये दे असे तो म्हणाला, असे फिर्यादित म्हटले आहे. काही दिवसांनी लोणी मसदपूर येथे भोंदूबाबाची भेट होताच तो राहिलेले हजार रुपये फिर्यादीला मागत होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी फिर्यादीच्या मुलीस पावडर खायला घातली का? असे विचारले असता महिलेने 'सगळी पावडर खायला घातली व ताईतही बांधले, पण काहीही फरक पडला नाही' असे सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

तिने कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना हा प्रकार सांगितला. त्या अनुसार कर्जत पोलिसांनी भोंदूबाबावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पांडुरंग भांडवलकर आणि राजेश थोरात करत आहेत. 
 

Web Title: In Ahmednagar Karjat cheated the woman by fraud man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.