अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: May 6, 2024 12:15 AM2024-05-06T00:15:45+5:302024-05-06T00:16:02+5:30
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठी कारवाई
राजकुमार जाेंधळे, लातूर: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूची विक्री हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस पथकाने रविवारी एकाचवेळी धाडी टाकल्या. यावेळी पाच वाहनांसह तब्बल ४ लाख ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात स्वतंत्र आठ गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना अहमदपूर शहरासह परिसरात माेठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक आणि विक्री केली जात आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांनी आपल्या विशेष पथकांसह अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या ९ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण पाच वाहनांसह ४ लाख ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात स्वतंत्र आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या आदेशानुसार अहमदपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलिस नाईक तानाजी आरदवाड, पोलिस काॅन्स्टेबल राजकुमार डबेटवार, पोकॉ. पाराजी पुठ्ठेवाड, पोकॉ. बापूराव धुळगंडे, पाेकाॅ. रूपेश कज्जेवाड यांच्यासह केली. पुढील तपास पोलिस हवालदार गुंडरे आणि पाेलिस हवालदार बाळू आरदवाड करत आहेत.